निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप
निपाणी (कर्नाटक) – शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्येच्या मानाने पूर्वीच्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरवासियांना भविष्यात भरपूर आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शहरात ‘तीन ओव्हरहेड टँक’, ‘फिल्टर हाऊस’ आणि नवीन पाणीवाहिनी यांसाठी २० कोटी ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे संमतीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती भाजप आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार सौ. शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, ‘‘निपाणीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत. पाणीपुरवठा करणारी वाहिनी जुनी झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली असल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे नवीन वाहिनी आणि ‘फिल्टर हाऊस’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला लवकरच संमती मिळेल. जवाहर तलावात पाणीसाठा वाढवा, यासाठी गाळ काढण्याचे काम चालू आहे, तसेच दूधगंगा नदीतून आणखी पाणी योजना राबवण्याचा विचार चालू आहे.’’ या वेळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नीता बागडे, सुनील पाटील, राजू गुंदेशा, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी यांसह अन्य उपस्थित होते.