श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना त्याने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेली सूत्रे !
आज ७ सप्टेंबर या दिवशी ‘गोपाळकाला’ आहे. त्या निमित्ताने…
‘बाप्पा (परात्पर गुरु डॉक्टर), एकदा मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघत असतांना माझ्या मनात काही विचार नव्हते. मी त्याच्या नेत्रांकडे बघत असतांना आपोआप माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मला एक वेगळीच ओढ लागली होती. मला वाटले, ‘जणू श्रीकृष्ण माझ्यासमोर उभा असून माझ्याकडे प्रेमळ दृष्टीने पहात आहे.’ मी त्याला आत्मनिवेदन करतांना श्रीहरीने सूक्ष्मातून मला पुढील सूत्रे सांगितली.
१. परिपूर्ण कर्म केल्यास प्रत्येक कर्म मलाच अर्पण होते
‘शिष्य गुरूंना तन, मन, धन आणि बुद्धी अर्पण करतो. शिष्याने तन अर्पण केले असल्याने गुरु शिष्याच्या देहाची शुद्धी करून घेतात. गुरु त्याला योग्य कर्म करायला शिकवतात. त्यामुळे ते कर्म परिपूर्ण होते. परिपूर्ण कर्म केल्यास प्रत्येक कर्म मलाच अर्पण होते.
२. गुरूंना शिष्यातील भक्तीअमृत दिसत नाही, तोपर्यंत गुरु त्या शिष्याला स्वतःच्या मनाची चिंतनप्रक्रिया करण्यास सांगून त्याच्या मनातील ‘स्वभावदोष आणि अहं’रूपी दगड अन् माती बाजूला करून घेत असतात !
शिष्याने गुरूंना मन अर्पण केल्यावर गुरु शिष्यातील सर्व स्वभावदोषांना दूर करून त्याला भक्तीअमृत देतात. मला भक्तीअमृत प्राशन करणे अधिक प्रिय आहे. ते अमृत सहजासहजी प्राप्त होत नाही. मानव भूमीतून जल मिळवण्यासाठी पाण्याचा झरा लागत नाही, तोपर्यंत खोदतो. एका टप्प्यापर्यंत भूमी खोदल्यावरच त्याला पाण्याचा झरा आढळतो. त्याप्रमाणे प्रत्येक जिवामध्ये खोलवर भक्तीअमृत पाझरत असतेच ! केवळ ते बाहेर काढण्याची (खोदण्याची) आवश्यकता असते. ‘कोणत्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक आहे’, हे अनुभवी जाणकारच सांगू शकतो. त्याप्रमाणे गुरूंनाही त्यांच्या शिष्याविषयी ज्ञान असते. त्या शिष्यातील भक्तीअमृत दिसत नाही, तोपर्यंत गुरु त्या शिष्याला त्याच्या मनाची चिंतनप्रक्रिया करण्यास सांगून त्याच्या मनातील स्वभावदोष आणि अहंरूपी दगड अन् माती बाजूला करून घेत असतात. ते अमृत मिळते, तेव्हा केवळ मी नव्हे, तर समष्टीतील माझे प्रत्येक रूप भक्तीअमृताचे प्राशन करून तृप्त होते.
३. गुरु शिष्याचा बुद्धीलय करून घेऊन त्याला योग्य विचार आणि चिंतन करायला शिकवतात !
शिष्य बुद्धी अर्पण करतो. त्या वेळी गुरु त्या शिष्याचा बुद्धीलय करून घेतात. त्याला योग्य विचार आणि चिंतन करायला शिकवतात. नंतर तो शिष्य ज्ञानी होतो. ‘ज्ञान’ माझेच रूप आहे. हे टप्पे पार केल्यावर तो शिष्य आपोआप गुरूंना समर्पित होतो. समर्पण म्हणजे ‘संत’ !
४. श्रीकृष्णाने वर्णिलेले गुरूंचे अगाध माहात्म्य !
गुरूंना तन, मन आणि बुद्धी अर्पण केल्यामुळे शिष्य ‘कर्म, भक्ती, ज्ञान आणि समर्पण’ या चारही स्तरांवर श्रेष्ठत्वाला जाऊन ईश्वराशी एकरूप होतो, म्हणजे मोक्षाला जातो. यासाठी गुरूंचे माहात्म्य अगाध आहे. ईश्वराने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी प्रत्येकाला तन, मन आणि बुद्धी दिली आहे. त्याद्वारे कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचे मूर्तीमंत रूप घडवणे, हे गुरूंचे माहात्म्य आहे. ईश्वर अवतार धारण करतो. तेव्हा तोही गुरुरूपापुढे नतमस्तक होतो.
५. श्रीकृष्णाने कथन केलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता !
परात्पर गुरुदेव एका वेळी केवळ बोटावर मोजू शकणार्या जिवांना नव्हे, तर शेकडो साधकांना घडवत आहेत. यातून ते अवतारी असल्याचे सिद्ध होतेच. तुझ्या मनात प्रत्येक क्षणी ‘असे गुरु लाभले’, याबद्दल पुष्कळ कृतज्ञताभाव असणे अपेक्षित आहे ! तू किती तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे !’, हे लक्षात घे आणि तन, मन अन् बुद्धी गुरूंना शरणागतीने समर्पित कर !’
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘बाप्पा, माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. मी अज्ञानी आहे. नारायणा, मी कशी शरण येऊ ? कशी सेवा करू ? मला काहीच ठाऊक नाही. गुरुराया, मी तुम्हालाच शरण आले आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपाने तुम्हीच सतत सगुणातून माझ्या समवेत असता. त्यांच्या माध्यमातून तुम्हीच मला दिशा दाखवून घडवत आहात. तुम्हालाच मी अनुभवते ! ‘नाथा, तुम्हीच या अज्ञानी बालकाला तुमच्या चरणांजवळ घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. अनन्या अक्षय पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२२)
|