भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका
‘भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका आणि त्यांची मुले, म्हणजे एक नांदते गोकुळ होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या अष्टनायिकांना एकूण ८० पुत्र अन् ६ कन्या होत्या. ६ सप्टेंबर या दिवशी झालेल्या ‘श्रीकृष्ण जयंती’च्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांची माहिती येथे देत आहोत.’
१. रुक्मिणी
ही विदर्भ देशाची राजकन्या. कुंडिणपूरचे राजे भीष्मक यांची ही कन्या. तिचा भाऊ रुक्मी हा जरासंधाच्या पक्षाचा होता. शिशुपाल रुक्मीचा जीवलग मित्र. त्याने भगिनी रुक्मिणीला शिशुपालास देण्याचा चंग बाधला. रुक्मिणीला ते पसंत नव्हते. तिने मनोमन श्रीकृष्णाला वरले होते. तिने सुदेव नावाच्या विश्वासू ब्राह्मणासमवेत कृष्णाला पत्र पाठवले. कृष्णाने रुक्मिणीचे सर्वांच्या डोळ्यांदेखत हरण केले. नंतर दोघांचा यथाविधी विवाह झाला. रुक्मिणी कृष्णाची पट्टराणी होती. तिला प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारू, चारु अशी १० मुले आणि चारुमती नावाची कन्या अशी एकूण ११ मुले होती.
२. जांबवती
ऋक्षराज जांबवत यांची ही कन्या. ही पुष्कळ सुंदर होती. ऋक्षराज आणि श्रीकृष्ण यांचे ‘स्यमंतक’ मण्यासाठी २८ दिवस युद्ध झाले. ऋक्षराज हरला. त्याने स्यमंतकमणी आणि स्वतःची जांबवती कन्या श्रीकृष्णास दिली. तिला सांब, सुमित्र, पुरुजित्, शतजित्, सहस्रजित्, विजय, चित्रकेतु, वसुमत, द्रविड , ऋतु असे १० पुत्र आणि एक कन्या होती. श्रीकृष्णाने देहोत्सर्ग (देहत्याग) केल्याचे कळताच हिने अग्निप्रवेश केला.
३. सत्यभामा
‘स्यमंतक’ मण्याचा मालक सत्राजित राजा याने श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला; पण पुढे श्रीकृष्ण निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यावर याने स्वतःची सुंदर आणि गुणी कन्या सत्यभामा कृष्णाला दिली. कृष्णाने हिच्या साहाय्याने नरकासुराचा वध केला आणि हिच्याकरता नंदनवनातून पारिजातक वृक्ष आणला. तिला भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमत्, चंद्रभानु, बृहद़्भानु, अतीभानु, श्रीभानु, प्रतिभानु असे पुत्र आणि सौभरिका, ताम्रपर्णी अन् जरंधरा, अशा ३ कन्या मिळून १३ मुले होती.
४. कालिंदी
ही पूर्वजन्मीची सूर्यकन्या होती. तिने यमुनेच्या तीरावर श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या केली. श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यास इंद्रप्रस्थला गेला होता. परत येत असतांना तिची भेट झाली. तिचा मनोदय जाणून श्रीकृष्णाने तिच्याशी विवाह केला. हिला श्रुत, कवी, वृष, वीर, सुबाह, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक असे १० मुले झाली.
५. मित्रविंदा
अवंती देशाचा राजा जयसेन आणि श्रीकृष्णाची आत्या राजाधिदेवी यांची ही कन्या. श्रीकृष्णाने हिच्या स्वयंवराला येऊन मित्रविंदाचे हरण करून विवाह केला. तिला वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, उन्नाद, महाश, पावन, वन्ही, क्षुधि असे १० पुत्र होते.
६. सत्या
ही कोसल देशाच्या नग्नजित राजाची कन्या. ही उपवर झाल्यावर नग्नजिताने हिचे ‘पण’ स्वयंवर मांडले. ७ मदोन्मत्त बैलांना वेसण लावून जो नांगराला जुंपेल, त्या विराला सत्या देण्याचा ‘पण’ होता. श्रीकृष्णाने हा ‘पण’ जिंकला. सत्याने कृष्णाच्या गळ्यात वरमाला घातली. हिला वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवत, वृष, आम, शंकु, वसु, कुंती असे १० पुत्र झाले.
७. भद्रा
वसुदेवाची बहीण श्रुतकीर्ती ही कैकय देशाचा राजा धृष्टकेतु याला दिली होती. यांना भद्रा नावाची कन्या झाली. श्रीकृष्णाच्या आत्येने आपल्या भाच्याशी हिचा विवाह लावून दिला. हिला संग्रामजीत, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अरिजित्, जय, सुभद्रा, वाम, आयु आणि सत्यक असे १० पुत्र अन् १ कन्या होती.
८. लक्ष्मणा (लक्षणा)
ही मद्रदेशाच्या राजाची कन्या. ही उपवर होताच राजाने हिचे स्वयंवर मांडले. मत्स्ययंत्राचा भेद करण्याचा ‘पण’ होता. या स्वयंवरास जरासंध, शिशुपाल, भीम, अर्जुन, दुर्योधन, कर्ण आणि अंबष्ट असे महारथी स्पर्धक होते. सर्वांनी प्रयत्न केला; पण कुणास यश आले नाही. केवळ अर्जुनाचा बाण मत्स्यास स्पर्श करून गेला. श्रीकृष्णाने मत्स्ययंत्राचा भेद करून ‘पण’ जिंकला आणि वरमाला श्रीकृष्णाच्या गळ्यात पडली. राजाने थाटामाटाने विवाह केला. हिला प्रघोष, गात्रवत्, सिंह, बल, प्रबल, उर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज अन् अपराजित असे १० पुत्र होते.
– श्री. दा. वि. कुलकर्णी (साभार : मासिक ‘धार्मिक’)