श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी ‘ढोलताशा महासंघा’ची पथकांना आचारसंहिता !
ढोलताशा महासंघाची पुणे येथे पत्रकार परिषद !
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबर्या गणपति चौक आणि टिळक चौक या ३ चौकांतच अधिकाधिक ८ ते १० मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केले जाणार आहेत. उर्वरित चौकांतून ही पथके वादन करतांनाच मार्गस्थ होणार आहेत. पथकांमध्ये ५० ढोल, १५ ताशे आणि ध्वजपथकांसह एकूण १५० ते २०० वादकांचा सहभाग रहाणार असून प्रत्येक वादकाच्या गळ्यात ओळखपत्र असेल, तसेच कोणतेही पथक ढोलवादन करणार नाही, अशी आचारसंहिता ‘ढोलताशा महासंघा’ने पथकांना घालून दिली आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन करणार्या पथकांना पुढील वर्षी नोंदणी देण्याविषयी पुनर्विचार केला जाईल, अशी चेतावणी महासंघाच्या पदाधिकार्यांनी ४ सप्टेंबर या दिवशी नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब, चौकांमध्ये लांबणारे वादन आणि कर्णकर्कश आवाज यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, अशा अनेक आरोपांना ढोलताशा महासंघाने उत्तरे दिली. विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी सर्व ढोलताशा आणि ध्वजपथक यांकडून गणेशोत्सव मंडळे अन् पोलीस यांना सहकार्य केले जाईल, अशी भूमिका महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मांडली. संजय सातपुते, विलास शिगवण, अधिवक्ता शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, संजय शिगवण आदी महासंघाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
ठाकूर यांनी पुढे सांगितले की,
१. यंदाच्या गणेशोत्सवात १७० ढोलताशा पथकांतील २२ सहस्र वादक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता आदी प्रमुख विसर्जन मार्गांवर प्रथमच पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांसमवेतच्या बैठकीत ढोलताशा महासंघाच्या पदाधिकार्यांनाही निमंत्रित केले होते.
२. ढोलताशा पथकांच्या सरावांसाठी आतापर्यंत अनुमती घेतली जात नव्हती. पोलीस प्रशासनासह संपर्क-समन्वयातूनच सराव केला जात होता. यंदा प्रथमच सरावाच्या अनुमतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरावासाठी मोकळ्या जागा मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, तरीही ‘नागरिकांना त्रास होऊ नये’, अशी आमची भूमिका असून त्यासाठी सरावाचा कालावधी दीड मासापर्यंत अल्प केला आहे.