विविध प्रकारची सेवा कौशल्‍याने करणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे फोंडा, गोवा येथील श्री. स्नेहल मनोहर राऊत (वय ३७ वर्षे) !

श्री. स्नेहल राऊत यांचा (श्रावण कृष्‍ण सप्‍तमी) ६.९.२०२३ या दिवशी ३७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या समवेत सेवा करणारे श्री. विनीत देसाई यांना त्‍यांची लक्षात आलेेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. स्नेहल राऊत यांना ३७ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्‍छा !

श्री. स्नेहल राऊत

१. श्री. स्नेहल राऊत यांनी विविध सेवा शिकून त्‍यात कौशल्‍य मिळवणे

१ अ. बांधकामाशी संबंधित सेवा करणे : ‘श्री. स्नेहल प्रारंभी बांधकामाशी संबंधित सेवा करत होते. तिकडे त्‍यांनी कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांना आश्रमाच्‍या खिडक्‍यांचे ग्रिल, गेट, शेड, तसेच इतर फॅब्रिकेशनची सेवा शिकून घेतली. बांधकामाशी संबंधित सेवा करतांना त्‍यांनी चारचाकी गाडी चालवणे शिकून ती सेवाही केली.

१ आ. चित्रीकरण करणे आणि छायाचित्रे काढणे : त्‍यांनी सर्वत्र जाऊन सत्‍संग घेणे, वैयक्‍तिक संपर्क करणे इत्‍यादी प्रसारसेवाही केली आहे. नंतर ते चित्रीकरण आणि छायाचित्रे काढण्‍याची सेवा करू लागले. ही सेवाही त्‍यांना नवीनच होती, तरी ते छायाचित्र काढण्‍यास शिकले आणि त्‍यांनी गुरुदेवांची (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) अनेक छायाचित्रे काढली. त्‍या निमित्ताने गुरुदेवांनी कौतुक करून त्‍यांना खाऊही दिला. ‘चित्रीकरण करणे, ऑनलाईन आणि ऑफलाईन संकलन करणे’, ही सेवाही ते शिकले.

२. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या समवेत दैवी दौर्‍यात श्री. स्नेहल राऊत यांनी कौशल्‍यपूर्ण केलेल्‍या सेवा

श्री. विनीत देसाई

२ अ. चारचाकी वाहन चालवणे : आता ते श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या समवेत दैवी दौर्‍यात असतात. तिकडेही ते सर्व सेवा शिकून त्‍या परिपूर्णरित्‍या करतात. दौर्‍यात ते वाहन चालवण्‍याची सेवा करतात. दौर्‍यात अनेकदा पुष्‍कळ लांब ठिकाणी प्रवास करण्‍याची वेळ येते. त्‍या वेळी ते सहजपणे ती सेवा करतात.

२ आ. चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याचा अभ्‍यास करून योग्‍य दरात साहित्‍य पाठवणे : दौर्‍यात असतांना ते चेन्‍नई येथून चित्रीकरणाला लागणार्‍या साहित्‍याचा अभ्‍यास करून आवश्‍यक आणि योग्‍य दरात उपलब्‍ध असलेले साहित्‍य नेहमी पाठवत असतात. अभ्‍यास करतांना ते सहसाधकांनाही शिकण्‍याच्‍या दृष्‍टीने अभ्‍यास करण्‍यास सांगतात. ते आपण साहित्‍य ज्‍यांच्‍याकडून घेतो, त्‍यांच्‍या नेहमी संपर्कात असतात. त्‍यामुळे बाजारात चित्रीकरणाच्‍या संदर्भात नवीन उपकरण आले, तर साहित्‍य वितरक श्री. स्नेहल यांना कळवतात. त्‍यामुळे आम्‍हालाही नवीन साहित्‍याची माहिती मिळते आणि अभ्‍यासही करता येतोे.

२ इ. प्रार्थना करून स्‍वयंपाक करणे : काही वेळा चेन्‍नई येथील सेवाकेंद्रात असतांना साधक नसतील, तर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्‍हालाच अल्‍पाहार किंवा स्‍वयंपाक बनवायला शिकवतात. श्री. स्नेहलदादा स्‍वयंपाकगृहातील सर्व सेवा करतात, उदा. कांदा चिरणे, पोहे करणे, भात शिजवणे आणि आमटी बनवणे. ते सर्व पदार्थ छान आणि चवीष्‍ट बनवतात.

२ ई. भावपूर्ण पूजा करणे : ते देवपूजाही पुष्‍कळ भावपूर्ण आणि छान करतात. या वर्षी नागपंचमीच्‍या वेळी आम्‍ही चेन्‍नई येथील सेवाकेंद्रात होतो. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. स्नेहलदादा यांना नागदेवतेचे चित्र काढून त्‍याची पूजा करायला सांगितले. तेव्‍हा श्री. स्नेहलदादांनी नागदेवतेचे पुष्‍कळ सुंदर चित्र काढून त्‍यामध्‍ये चंदन भरून त्‍याची पूजा केली. ती बघूनच आमची पुष्‍कळ भावजागृती होत होती.

३. विविध गुण अंगी असलेले श्री. स्नेहल राऊत !

श्री. स्नेहलदादांमध्‍ये अनेक गुण आणि शिकण्‍याची वृत्ती असूनही ते नेहमी नम्र असतात. ते कर्तेपण देवाला देतात. ते सहसाधकांनाही पुष्‍कळ साहाय्‍य करतात. कुठलीही सेवा ते नेहमी अभ्‍यास करून परिपूर्ण करायला सांगतात.

श्री. स्नेहलदादांसारखे गुण असलेला साधक देवाने दिल्‍याबद्दल तीनही गुरूंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या) चरणी कोटीशः कृतज्ञता ! त्‍यांच्‍यातील गुण आमच्‍यामध्‍येही यावेत, हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. विनीत देसाई, चेन्‍नई (३१.८.२०२२)