रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्‍वागतकक्षात श्रीकृष्‍णाचे चित्र आहे. ४.७.२०२३ या दिवशी श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील सुदर्शनचक्रावरील हाराच्‍या भागातीलच फुले गळून पडली आहेत आणि बाकी हार आहे तसाच आहे. याविषयी श्रीकृष्‍णाच्‍या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. रामनाथी आश्रमातील श्रीकृष्‍णाचे चित्र जागृत अवस्‍थेत असणे

आश्रमातील श्रीकृष्‍णाचे चित्र जागृत अवस्‍थेत आहे. त्‍यामुळे श्रीकृष्‍णाच्‍या प्रत्‍येक अवयवातून, तसेच त्‍याच्‍या सुदर्शनचक्रातून तारक आणि मारक कार्य सातत्‍याने घडत असते.

श्री. राम होनप

२. श्रीकृष्‍णाचे चित्र जागृत अवस्‍थेत येण्‍यामागील कारणे

अ. आश्रमात परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्‍यक्ष उपस्‍थित आहेत. त्‍यांची ‘निःस्‍वार्थ साधना आणि भक्‍ती’ यांवर प्रसन्‍न होऊन श्रीकृष्‍णाला ‘रामनाथी आश्रमासाठी कार्य करावे’, अशी इच्‍छा होते.

आ. आश्रमात संत आणि भाव असलेले काही साधक आहेत. त्‍यामुळे श्रीकृष्‍णाची अवस्‍था प्रसन्‍न असते. त्‍यामुळे तो स्‍वतःची तटस्‍थ भूमिका सोडतो आणि ‘आश्रमाचे रक्षण करणे अन् साधकांचा सांभाळ करणे’, हे कार्य करतो.

३. श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील सुदर्शनचक्रावरील हाराच्‍या भागातीलच फुले गळून पडण्‍यामागील कारण

रामनाथी आश्रमावर असुरांची आक्रमणे सूक्ष्मातून नेहमी होत असतात. ४.७.२०२३ या दिवशी रामनाथी आश्रमावर असुरांचा एक समूह सूक्ष्मातून आक्रमण करणार होता. त्‍याद्वारे त्‍यांचे आश्रमातील साधकांमध्‍ये रोगराई उत्‍पन्‍न करून ती पसरवण्‍याचे नियोजन होते. हे पाहून श्रीकृष्‍णाला क्रोध आला. त्‍यामुळे त्‍या असुरांना रोखण्‍यासाठी श्रीकृष्‍णाचे सुदर्शनचक्र क्षणात कार्यरत झाले. त्‍या वेळी सुदर्शनचक्रात प्रचंड मारक शक्‍ती कार्यरत झाली आणि ती असुरांच्‍या दिशेने प्रक्षेपित झाली. त्‍याचा परिणाम म्‍हणून, सुदर्शनचक्रावरील हाराच्‍या भागातीलच फुले गळून पडली आहेत आणि बाकी हार आहे तसाच राहिला.

४. श्रीकृष्‍णाचे सुदर्शनचक्र कार्यरत होण्‍याचा झालेला लाभ

श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्रातून निर्माण झालेल्‍या प्रचंड मारक शक्‍तीने आश्रमात रोगराई उत्‍पन्‍न करण्‍यासाठी येणार्‍या असुरांचा जोर क्षणात न्‍यून झाला आणि ते पाताळात परत गेले. त्‍यामुळे आश्रमातील साधकांवरील संकट टळले.

५. श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्राचे वैशिष्‍ट्य

श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्रात त्‍याच्‍या ‘क्रोधिणी’ नावाच्‍या एका ‘पराशक्‍ती’चा, म्‍हणजे उच्‍च शक्‍तीचा वास असतो.

५ अ. श्रीकृष्‍णाच्‍या ‘क्रोधिणी’ नावाच्‍या शक्‍तीचे वर्णन : ही शक्‍ती देवीस्‍वरूप आहे. तिचा मूळ स्‍वभाव ‘क्रोध’ हाच आहे. त्‍यामुळे तिला ‘क्रोधिणी’, असे म्‍हणतात. तिचे रूप उग्र असून डोळे लाल आणि मोठ्या आकाराचे आहेत. तिचे शरीर नेहमी तप्‍त असते. ‘असुरांमध्‍ये भय उत्‍पन्‍न करणे किंवा त्‍यांना भस्‍म करणे’ हा तिचा धर्म, म्‍हणजे कार्य आहे.

५ आ. श्रीकृष्‍णाची ‘क्रोधिणी’ शक्‍ती ही अग्‍निदेवाची पत्नी ‘ज्‍वालिनी’ हिची सखी असणे : अग्‍निदेवाच्‍या एका पत्नीचे नाव ‘ज्‍वालिनी’ आहे. ही ज्‍वलनाच्‍या संदर्भातील कार्य करते. श्रीकृष्‍णाची ‘क्रोधिणी’ शक्‍ती ही अग्‍निदेवाची पत्नी ‘ज्‍वालिनी’ हिची सखी आहे. त्‍याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे, ‘श्रीकृष्‍णाच्‍या ‘क्रोधिणी’ शक्‍तीला असुरांचा क्रोध येतो. त्‍यामुळे असुरांचा जोर क्षणात न्‍यून होतो. तिला आणखी क्रोध आल्‍यास ती असुरांना जाळून टाकते. तेव्‍हा अग्‍निदेवाची पत्नी ‘ज्‍वालिनी’ नावाची देवी कार्य करते. असुरांच्‍या नाशासाठी श्रीकृष्‍णाची ‘क्रोधिणी’ शक्‍ती आणि अग्‍निदेवाची ‘ज्‍वालिनी’ शक्‍ती एकत्रित कार्य करतात. त्‍यामुळे ‘त्‍या दोघी एकमेकांच्‍या सखी आहेत’, असे म्‍हटले आहे.’

६. श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्राचे कार्य करण्‍यातील टप्‍पे

जेव्‍हा असुरांचे भक्‍तांवर आक्रमण होणार असते, तेव्‍हा श्रीकृष्‍णाला क्रोध येतो. त्‍याच्‍या इच्‍छेनुसार त्‍याच क्षणी त्‍याच्‍या हातातील बोटावरील सुदर्शनचक्र फिरू लागते आणि त्‍यातील ‘क्रोधिणी’ शक्‍ती क्षणात प्रगट होते. त्‍याच्‍या पुढच्‍या क्षणी क्रोधिणी असुरांमध्‍ये प्रचंड भय उत्‍पन्‍न करते किंवा त्‍यांचा नाश करते. श्रीकृष्‍णाच्‍या आज्ञेनुसार क्रोधिणीचे कार्य काही क्षणांतच पूर्ण होते.

७. रामनाथी आश्रमातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्रात प्रगट होणारे विविध मारक भाव आणि त्‍याचा असुरांवरील परिणाम

७ अ. श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील डोळे अकस्‍मात् रागाने मोठे होणे : श्रीकृष्‍णाचे चित्र जागृत झाल्‍याने त्‍याचे डोळे कधी अकस्‍मात् मोठे होतात. त्‍या वेळी असुर रामनाथी आश्रमावर आक्रमण करण्‍याच्‍या सिद्धतेत असतात. त्‍या वेळी प्रखर सूर्यप्रकाशाकडे पाहिल्‍यावर जसे मनुष्‍याला तेज सहन होत नाही, तसा त्रास असुरांनी रामनाथी आश्रमाकडे पाहिल्‍यावर त्‍यांना होतो. त्‍यामुळे ते आश्रमावर सूक्ष्मातून आक्रमण करण्‍याचे रहित करतात.

७ आ. श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील सुदर्शनचक्र कार्यरत होणे : जेव्‍हा श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील सुदर्शनचक्र कार्यरत होते, तेव्‍हा असुरांना रामनाथी आश्रमाच्‍या भोवती सूक्ष्मातून सुदर्शनचक्र असल्‍याचे दृश्‍य दिसते. त्‍यामुळे अशा प्रसंगी असुर आश्रमावर सूक्ष्मातून आक्रमणे करणे टाळतात.

७ इ. श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील डोळे रागाने मोठे होणे आणि त्‍याचेे सुदर्शनचक्र कार्यरत होणे, यांतील भेद : जेव्‍हा श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील डोळे रागाने मोठे होतात, तेव्‍हा आश्रमावर सूक्ष्मातून आक्रमणे करणार्‍या असुरांची काळी (त्रासदायक) शक्‍ती मोठ्या प्रमाणात नष्‍ट होते आणि त्‍या वेळी त्‍या असुरांना वेदना मर्यादित स्‍वरूपात होतात. ‘जेव्‍हा श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील सुदर्शनचक्र कार्यरत होते, तेव्‍हा आश्रमावर सूक्ष्मातून आक्रमणे करणार्‍या असुरांची काळी शक्‍ती मोठ्या प्रमाणात नष्‍ट होते आणि त्‍या वेळी त्‍या असुरांना वेदना अधिक प्रमाणात होतात.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.