संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांच्यावर करण्यात येणारे आरोप आणि त्याचे खंडण
आज ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘काही वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही विद्वान अधिवक्त्यांनी अभिरूप न्यायालयाचा (नाट्य रूपात न्यायालय सादर करणे) कार्यक्रम आयोजित केला होता. या न्यायालयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्याचे करण्यात आलेले खंडण येथे देत आहोत.
आरोप १ : भारतावरील परकीय राजवटीमुळे हिंदू जनता ग्रासली असतांना ज्ञानेश्वरांसारख्या संतांनी काहीही हालचाल न करता अध्यात्माच्या नादी लागून आपला देश बुडवला. समर्थ रामदास हे खरे संत होते; कारण परकीय आक्रमण लक्षात घेऊन त्यांनी पुष्कळ मोठे कार्य केले; पण ज्ञानेश्वरादी संत याविषयी दोषी असून त्यांना संत न म्हणता ‘संताळ’ (एक मुंडा वांशिक आदीम जमात) म्हणणे योग्य आहे.
खंडण : भारतावर पूर्वी अनेक परकियांच्या स्वार्या झाल्या, त्यांचा उद्देश राजकीय होता; पण जेव्हा इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा ते परचक्र नुसत्या सत्तेवर संतुष्ट नव्हते, तर येथील हिंदु धर्म नष्ट करून त्या जागी इस्लाम धर्म स्थापण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. भारतातील देवस्थाने तोडून त्या जागी मशिदी उभारण्याचे काम जोरात चालू होते. पूर्वी आलेले परकीय लोक आपल्या धर्मात मिसळले गेले; पण इस्लामने सवता सुभा (स्वतंत्र प्रांत) उभारून येथील धर्म नष्ट करण्याचा चंग बांधला. इस्लामच्या महापुरात आपला धर्म वाहून जाण्याची भयंकर भीती निर्माण झालेली असतांना बुद्धीमंतांना तत्त्वज्ञान, भाविकांना प्रेेमामृत आणि सामान्यांना शांतीस्थान म्हणून सिद्धांत अन् दृष्टांत, तसेच साधुत्व आणि कवित्व यांचा अपूर्व संगम असलेली ‘ज्ञानेश्वरी’ लिहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी इस्लाम धर्माची लाट थोपवण्याचे जे भव्य-दिव्य कार्य केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याच्या योग्यतेचे आहे.
संत नामदेव यात्रेला जाण्यास सिद्ध नव्हते; पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या आग्रहाखातर जी महान यात्रा झाली, त्याचा आंतरिक उद्देश इस्लाम धर्माची लाट थोपवणे, हा होता. बेदरच्या बादशाहने गाय मारली; पण ‘संत नामदेवांनी ती गाय जिवंत केली’, अशी एक गोष्ट आहे. हे रूपक आहे. या गोष्टीतील ‘गाय म्हणजे हिंदु धर्म’, असा भावार्थ आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी तात्त्विक दिव्यतेला सात्त्विक मानवतेची जोेड देऊन राव-रंक, महाजन-हरिजन, रसिक-भाविक अशा सर्व लोकांना संस्कारित करण्याचे जे ऐतिहासिक कार्य केले, त्यामुळे इस्लामीवाद्यांना हिंदु धर्माची गाय मारता आली नाही. महाराष्ट्र स्वराज्य होते; पण इस्लामवाद येऊ घातला होता. अशा वेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी गीतेस देशीकार लेणे करून ‘मर्हाठीयेचिया नगरी’ जो ब्रह्मविद्येचा सुकाळ केला, त्यामुळे त्यांचे लेणे हिंदु धर्मरक्षणाचे कवच आहे. ही ऐतिहासिक वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ‘मानवतेचे महावतार जे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, हे ‘संत नसून संताळ होते’, असे म्हणणे, म्हणजे ‘मदनाला सौंदर्य नाही, कुबेराला श्रीमंती नाही, सीतेला पातिव्रत्य नाही, रामाला पितृप्रेम नाही, रुक्मिणीला भक्तीप्रेम नाही, कृष्णाला तत्त्वज्ञान नाही, तानसेनला गाणे नाही आणि चंद्राला चांदणे नाही’, असे म्हणण्याप्रमाणे आहे.
आरोप २ : प्रख्यात साहित्यिक विठ्ठलराव घाटे यांनी म्हटले होते, ‘ज्ञानेश्वरांची समाधी म्हणजे आत्महत्या आहे.’ त्यांचे हे म्हणणे अगदी योग्य आहे. आत्महत्या करणारा मनुष्य दोषी आहे. अशा माणसाला मोठेपणा देणे, म्हणजे शुद्ध भाबडेपणा आहे.
खंडण : जेव्हा प्रख्यात साहित्यिक विठ्ठलराव घाटे म्हणालेे, ‘‘ज्ञानेश्वरांची समाधी म्हणजे आत्महत्या आहे’’, तेव्हा विख्यात साहित्यिक आचार्य अत्रे उत्तर देतांना म्हणाले होते, ‘‘ज्ञानेश्वरांची समाधी म्हणजे आत्महत्या आहे, असे म्हणणारा घाटे यासारखा नराधम गेल्या ६०० वर्षांत झाला नसेल.’’ समाधी आणि आत्महत्या यांत मूलभूत भेद आहे.
आत्महत्या करणारा मनुष्य निराशेच्या टोकाला जाऊन कुणालाही न कळता गुप्तपणे आत्महत्या करतो. तो मेल्यावर त्याचा बेत इतरांना कळतो; पण समाधी घेणारा मनुष्य ‘आनंदाच्या टोकाला जाऊन आपले जीवन कार्य संपले’, असे समजून लोकांना सांगून समाधी घेतो. सानेगुरुजी, न्यायाधीश बावडेकर आणि प्रा. धवडगाव यांनी निराशेच्या टोकाला जाऊन कुणालाही न कळवता आत्महत्या केली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘आपले जीवनकार्य संपले’, असे समजून यात्रा संपल्यावर पंढरपुरात घोषित केले, ‘मी आळंदी येथे कार्तिक वद्य त्रयोदशीस समाधी घेणार !’
संन्याशाच्या पोरांनी आळंदीची भूमी विटाळली; म्हणून तेथील लोक भूमीवर गोमूत्र शिंपडत असत; पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या समाधीचा सोहळा पाहून त्यांच्या डोळ्यांत व्याकुळता साठवली गेली. त्यांच्या मेंदूत समाधीच्या पाण्याचे फवारे उडू लागून त्यांच्याविषयीची हीन विचारांची जळमटे साफ धुतली गेली. त्यामुळे त्यांना वाटू लागले, ‘गोमूत्रामुळे भूमी पुनीत झाली नाही, तर ज्या भूमीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा स्पर्श झाला, त्या भूमीमुळे ते गोमूत्रच पवित्र झाले.’ भक्तीप्रेमाचा सागर, ज्ञानाचा आगर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर समाधी घेणार; म्हणून जमलेल्या लोकांचे प्राण कासावीस होत होते, जीव तडफडत होता. ‘कासावीस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ।’ – संत नामदेव, म्हणजे ‘पाण्याविना मासोळीचे जसे होते, तसे सर्वांचे प्राण कासावीस झाले, मन तळमळू लागले.’
‘संतांचा संत, पंतांचा पंत, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, चिंतकांचा चिंतामणी, ज्ञानियांचा शिरोमणी’, अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे संत नामदेवांनी केलेले वर्णन आज २० व्या शतकात जरी आपण वाचू शकलो, तरी आपले डोळे अश्रूंनी भरून येतात आणि त्या अश्रूंच्या पुरात आत्महत्येचा आरोप पाचोळा वाहून जावा, त्याप्रमाणे वाहून जातो आणि आपल्या हाती लागतात, ते निर्दोष, निष्कलंक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर !
आरोप ३ : ज्ञानेश्वरांनी प्रयत्नावादावर भर न देता दैववादावर भर दिला. त्यामुळे समाजाची त्यांनी पुष्कळ मोठी हानी केली. समर्थ रामदास पहा ! त्यांनी प्रयत्नवादावर जोर देऊन समाजाचे कल्याण केले. ज्ञानेश्वरांनी तसा जोर दिला नाही; म्हणून ते दोषी असून सामाजिक गुन्हेगार आहेत.
खंडण : समर्थ रामदास लग्नमंडपातून पसार झाले आणि तपश्चर्या करून त्यांनी समाजाला संदेश दिला, ‘यत्न तो देव जाणावा ।’ म्हणजे ‘प्रयत्न हा देवासमान जाणावा.’ ‘दैवं चैवात्र पञ्चमम् ।’ (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय १८, श्लोक १४), म्हणजे ‘पाचवे कारण दैव आहे’, असे म्हणून गीतेने दैवाला थोडीशी किंमत दिली आहे; पण ‘उद्धरेदात्मनात्मानम् ।’ (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ६, श्लोक ५) म्हणजे ‘स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा’, असे म्हणून अधिकाधिक जोर प्रयत्नवादावर दिला आहे. ज्याला परमार्थाची आस आहे, त्याने प्रयत्नांची कास धरली पाहिजे आणि ‘प्रयत्नांविना परमार्थ म्हणजे रामाविना रामायण आहे’, हा विचार मनात बाळगणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होते. ‘यत्न तो देव जाणावा ।’ म्हणजे ‘प्रयत्न हा देवासमान जाणावा’, असे समर्थ म्हणतात आणि संतांचे संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘म्हणोनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १२, ओवी ११३) म्हणजे ‘म्हणून अभ्यासाने कोणतीही गोष्ट साधणे मुळीच कठीण नाही.’
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे बोल स्पष्ट करतांना जगद़्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘असाध्य तें साध्य करितांसायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥’ (तुकाराम गाथा, अभंग २९८, ओवी ३) म्हणजे ‘सतत प्रयत्नाने असाध्य गोष्टीही साध्य होतात, त्याला अभ्यास हेच कारण आहे.’ समाजसेवेच्या गंधाक्षतांना ज्ञानाच्या पुष्पांनी, प्रयत्नांच्या धुपारतीने आणि भक्तीच्या नैवेद्याने जनता-जनार्दनाची पूजा करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर प्रयत्नवादाचे मूर्तीमंत अवतार होते.
अभिरूप न्यायालयात न्यायाधीश राम केशव रानडे यांनी घोषित केलेला गोषवारा !
‘‘साधकांची सावली असणारी, माता गाऊली माझी संतश्रेष्ठ ज्ञानोबामाऊली सार्या आरोपातून दोषमुक्त आहे; पण त्या माझ्या माऊलीला मुक्त करणारा मी कोण ? ती तर मुक्तच आहे. तीच तुम्हा आम्हा सर्वांना मुक्त करो, इतकीच प्रार्थना !’’
(साभार : मासिक ‘ज्ञानदूत’, दीपावली अंक) – न्यायाधीश राम केशव रानडे