श्रीकृष्ण जन्माष्टमी
‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
(श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ४, श्लोक ८)
(अर्थ : सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो.),
अशी ग्वाही देणार्या महाविष्णूने विशेष असे दशावतार धारण केले आहेत. यात श्रीराम आणि श्रीकृष्ण अधिक लोकप्रिय आहेत. प्रभु रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल ९, माध्यान्हकाळी, तर गोपाळकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण ८, मध्यरात्री झाला आहे. अधर्मावर घाला घालणारा महाकाळ उदयास आला; म्हणून गोपाळकृष्णास ‘काळा’, असेही संबोधले जाते. प्रभु रामचंद्रांकडून संसारातील आचार पालन, तर राष्ट्र-धर्म श्रीकृष्णाकडून शिकावा. अशा धर्मावतार भगवान गोपाळकृष्णांचा जन्मोत्सव, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी होय. जन्मोत्सवाचे दुसर्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणून ‘दहीहंडी’, ‘गोपाळकाला’ केला जातो.
– जगद़्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज
(साभार : ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’, ऑगस्ट २०११)