सालंगपूर (गुजरात) येथील स्वामीनारायण मंदिरातील श्री हनुमानाची अवमानकारक चित्रे हटवली !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम !

सालंगपूर स्वामीनारायण मंदिरातील वादग्रस्त भगवान हनुमानाचे भित्तीचित्र काढले

सालंगपूर (गुजरात) – येथील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर रेखाटण्यात आलेली श्री हनुमानाची अवमानकारक चित्रे आता हटवण्यात आली आहेत. ४ सप्टेंबर या दिवशी संत आणि हिंदु संघटना यांनी घेतलेल्या बैठकीत चित्रे हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ती ५ सप्टेंबरला हटवण्यात आली. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हटवण्यात आलेल्या चित्रांच्या ठिकाणी आता नवीन चित्रे लावण्यात येणार आहेत. या चित्रांमध्ये श्री हनुमानाला सहजानंद स्वामी यांचा सेवक दाखवण्यात आले होते. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला होता. एका व्यक्तीने ही चित्रे हटवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामुळे गुजरातमध्ये वाद झाला होता.

४ सप्टेंबर याच दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत याविषयावर साधू, संत आणि हिंदु नेते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा वाद लवकरात लवकर मिटवण्यावर संमती झाली होती. आता हा वाद संपूर्णपणे मिटवण्यात आला आहे.

स्वामीनारायण संप्रदाय वैदिक सनातन धर्माचाच अंग ! – परमानंद स्वामी

या संदर्भात परमानंद स्वामी यांनी सांगितले होते की, स्वामीनारायण संप्रदाय वैदिक  सनातन धर्माचाच अंग आहे. या संप्रदायाचे सर्व भक्त, संत वेदिक परंपरा, पूजा विधी आणि प्रथा यांचे पालन करतात. हिंदु समाजाचा एक भाग असल्याने स्वामीनारायण संप्रदाय समाजाची भावना दुखावू इच्छित नाही.