माजी मंत्र्यांचा आदर्श घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र द्यावे ! – शरद पवार
जळगाव – जालना येथील घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र दिले पाहिजे. गोवारींवर लाठी आक्रमण झाले नव्हते. तेथे चेंगराचेंगरी झाली होती. त्या वेळी या घटनेनंतर संबंधित खात्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी त्वरित त्यागपत्र दिले होते. मुंबई येथील घटनेनंतरही माजी गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील यांनी त्यागपत्र दिले होते. पूर्वीच्या या २ उदाहरणांतून फडणवीस यांनी प्रेरणा घेऊन त्यावर विचार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
पवार पुढे म्हणाले की,
१. ‘एक देश एक निवडणुकी’वर चर्चा आणि विशेष अधिवेशन बोलावणे, हा देशातील महत्त्वाच्या सूत्रांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.
२. इतर मागासवर्गियांच्या (आबीसींच्या) कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींमधील गरीब लोकांवर अन्याय होईल. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे.
३. मराठा समाजातील लोकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणीफडणवीस यांनी क्षमा मागितली आहे. ‘क्षमा मागितली; म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते’, असे त्यांनीच एकप्रकारे मान्य केले आहे. जालना येथे लाठीमार करण्याचा आदेश कुणी दिला ? तेथे लाठीमाराची आवश्यकता होती का ? या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे; कारण प्रशासन त्यांच्या हातात आहे.