मराठा आरक्षणाविषयी न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शंभूराज देसाई यांनी घेतली उदयनराजे यांची भेट !
सातारा, ४ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तो अल्प होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या खटल्याविषयी माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही ? त्यांनी स्वत: आरशासमोर उभे रहावे आणि स्वत:ला प्रश्न विचारावा. महाविकास आघाडी सरकारच्या काळात योग्य बाजू कोर्टात मांडली असती, तर आरक्षण टिकले असते.’’ |