सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्या आणि तळमळीने समष्टी सेवा करून सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !
पू. (कु.) दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास आणि संत-सन्मान सोहळा !
१.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर या ‘गोपीभावा’तून, म्हणजे व्यष्टी भावातून समष्टी भावाकडे वळणे, कु. दीपाली यांना परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती’ ही सूत्रे पाहिली. आजच्या भागात आपण पू. दीपालीताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
(भाग ३)
८. अल्प अहं आणि देवाशी असलेले अखंड अनुसंधान यांमुळे ‘देवच सर्व करून घेत आहे’, हे लक्षात येऊन सतत कृतज्ञता वाटणे
सद़्गुरु स्वाती खाडये : सोलापूर सेवाकेंद्र आणि सोलापूर जिल्हा येथील सेवा करतांना तुम्हाला कधी ‘अहं वाढेल’, अशी भीती वाटली का ? तुमचा अहं कधी वाढला का ?
कु. दीपाली मतकर : ‘अहं वाढला, तर आपण श्री गुरूंपासून दूर जातो’, हे ठाऊक असल्यामुळे अहंचा विचार मनात आल्यावर माझे मन अस्वस्थ व्हायचे. ‘अहंमुळे मी श्री गुरूंपासून दूर गेले’, असे व्हायला नको’, असे मला वाटायचे.
सद़्गुरु स्वाती खाडये : मनात अहंचे विचार येतात ना ! काही वेळा त्यांची भीतीही वाटते; पण त्या विचारांवर तुम्ही मात कशी केली ?
कु. दीपाली मतकर : कुठलीही सेवा पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात यायचे, ‘मी ही सेवा करू शकेन’, एवढी माझी क्षमता नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारे गुणही माझ्यामध्ये नाहीत, म्हणजे ती सेवा देवच करत आहे.’ त्यामुळे माझे त्या विचारांमध्ये अडकणे होत नाही. माझ्या मनात नेहमी ‘मला काही जमत नाही आणि माझी तेवढी क्षमता नाही; पण देवच सर्व करून घेत आहे’, असे विचार असतात. त्यामुळे मला सतत कृतज्ञताच वाटते.
सद़्गुरु स्वाती खाडये : तुमच्या मनात उपजतच ‘मला काही जमत नाही. देवाने मला सेवा दिली आहे आणि देव माझ्याकडून ती करून घेत आहे’, असा भाव आहे. तुमच्या मनात ‘देव माझ्याकडून सेवा करून घेणारच आहे’, अशी अढळ श्रद्धा आहे. तुमचे देवाशी सतत अनुसंधान असल्यामुळे देवाचेे चैतन्य तुमच्या आत जायचे. देव तुम्हाला सगळे शिकवत होता आणि तुम्ही ते सगळे शिकत होता. असे देवाशी सतत अनुसंधान ठेवायला पाहिजे. बर्याच जणांना सेवा करतांना अनुसंधान ठेवणे कठीण वाटते; पण तुम्ही ते सहजच ठेवत होता. ‘तुम्हाला ते कसे जमायचे ?’, ते सांगा.
कु. दीपाली मतकर : अनुसंधान, म्हणजे माझ्या मनात जे विचार चालू आहेत, ते मी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर किंवा भगवान श्रीकृष्ण यांना सांगत असे. मी म्हणत असे, ‘आता मी जी सेवा करत आहे, ‘ती कशी करायची ?’, हे मला ठाऊक नाही. तुम्हीच या आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या.’ मी प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्यांना सांगते आणि ‘तेच ती सेवा करून घेत आहेत’, यासाठी कृतज्ञता व्यक्त करते.
सद़्गुरु स्वाती खाडये : देवच तुम्हाला सगळे आतून सुचवायचा. ‘संत मीराबाई, संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर हे सतत विठ्ठलनामात दंग असायचे. गोरा कुंभार मातीची भांडी बनवतांनाही सारखा विठ्ठलनामाचा गजर करायचा. तुमच्याकडूनही असेच होत आहे. तुम्ही ईश्वराशी सतत बोलता आणि ईश्वर तुम्हाला सेवेविषयीची सूत्रे सुचवून तुमच्याकडून सेवा परिपूर्ण करून घेतो. त्यामुळे साधनेतला हा सगळ्यांत मोठा टप्पा तुम्ही अगदी लहान वयात (वयाच्या ३३ व्या वर्षी) गाठला आहे. फारच छान !
९. कु. दीपाली मतकर यांच्या संतसन्मान सोहळ्यातील सूत्रे !
९ अ. पू. (कु.) दीपाली मतकर संतपदी विराजमान झाल्याचे सांगणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश ! : सद़्गुरु स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर संत झाल्याविषयीचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवला.
९ आ. पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या समवेत सेवा करणार्या काही साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
सद़्गुरु स्वाती खाडये : अनेक साधक पू. दीपालीताईंच्या समवेत सेवा करतात. आता त्यांतील काही साधक पू. दीपालीताईंविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगतील.
९ आ १. सौ. विद्या कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५३ वर्षे), सोलापूर
‘किती सांगू मी, सांगू कुणाला । आज आनंदीआनंद झाला ॥
रास खेळू चला, रंग उधळू चला । आज आनंदीआनंद झाला ॥
पू. दीपालीताईंविषयी काय सांगू ? त्या गुणांची खाणच आहेत. ‘गुरुमाऊलींनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साधकांनापू. दीपालीताईंसारखे संतरत्न दिले’, याबद्दल मी मनापासून पुष्कळ कृतज्ञ आहे !
९ आ १ अ. ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांचे भावपूर्ण बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटणे : पू. दीपालीताईंचे एक वैशिष्ट्य, म्हणजे पहाटे ५.३० वाजल्यापासून रात्री ३ वाजेपर्यंत कुठल्याही सत्संगातील किंवा भ्रमणभाषवरील बोलणे असू दे, त्यांच्या आवाजामध्ये किंचितही पालट नसतो. तो भावपूर्ण आवाज ऐकूनच माझे हृदय भरून येते. तो मंजुळ आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले असतात आणि ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते.
९ आ १ आ. सत्संगातील पू. दीपालीताईंचा गोड आवाज ऐकून साधिकेच्या साधना करत नसलेल्या सुनेने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करणे : गेल्या दोन मासांपासून माझी सून आणि बाळ घरी आले आहेत. ‘गुरुकीर्तन’ सत्संगामध्ये पू. दीपालीताई भावार्चना घेतात. तेव्हा बाळ शांतपणे ती भावार्चना ऐकते. सून म्हणते, ‘‘आई, या ताईंचा आवाज किती गोड आहे हो ! देवाने यांना कसे निर्माण केलेे आहे ! त्यांचे बोलणे ऐकतांना माझे मन भरून येते आणि ‘ही भावार्चना ऐकतच रहावी’, असे वाटते. या कोण आहेत ?’’ सुनेने मला असे २ – ३ वेळा विचारलेे. तेव्हा मी तिला पू. दीपालीताईंविषयी सांगितले. त्यावर ती मला म्हणाली, ‘‘एकदा आपण सेवाकेंद्रामध्ये जाऊन त्यांना भेटूया.’’ खरेतर माझ्या सुनेला साधना ठाऊकही नाही, तरीही ती पू. दीपालीताईंच्या भावार्चनेने अशी भारावून जाते.
‘गुरुमाऊलींनी असे गोड संतरत्न आम्हा साधकांना देऊन आमच्यावर पुष्कळ कृपा केली आहे’, याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता !’
९ आ २. वर्षा कुलकर्णी, सोलापूर
९ आ २ अ. ‘पू. दीपालीताईंचे सेवाकेंद्रातील साधकांच्या समवेतच जिल्ह्यातील प्रत्येक साधकाकडे तितकेच बारकाईने लक्ष असते. ‘प्रत्येक साधकाची साधना व्हायला हवी’, अशी तीव्र तळमळ त्यांच्यामध्ये आहे.
९ आ २ आ. सकारात्मकता : त्यांच्यामध्ये गुरुसेवेचा ध्यास आणि सकारात्मकता आहे. नकारात्मक विचार त्यांच्या आजूबाजूलाही फिरकत नाहीत. आम्ही सतत हेच अनुभवले आहे. ‘एखादी गोष्ट होणार नाही’, असे त्यांच्या बोलण्यात कधीच नसते किंवा तसा विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही.
९ आ २ इ. साधकांना ‘देवाप्रती उत्कट भाव कसा असायला हवा ?’, हे शिकवणे : पू. दीपालीताई आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द आमच्या अंतर्मनापर्यंत जातो. त्यामुळे त्यानुसार आमचे प्रयत्न आपोआपच होतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला अनुभवताही येते. पू. दीपालीताई प्रतिदिन व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘देवाप्रती उत्कट भाव कसा असायला हवा ?’, हे आम्हाला शिकवतात. आमच्या मनात देवाप्रती भाव निर्माण होण्यासाठी आम्हाला या आढाव्यांचा पुष्कळ लाभ झाला.
९ आ २ ई. ‘पू. (कु.) दीपाली मतकर जे बोलतात, ते सत्यच होते’, असे आम्ही आतापर्यंत अनुभवले आहे.
‘मला पू. दीपालीताईंचा सहवास लाभला’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टर, सद़्गुरु स्वातीताई आणि पू. दीपालीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
९ आ ३. सौ. सोनल कोठावळे, बार्शी, जिल्हा सोलापूर.
९ आ ३ अ. पू. दीपालीताईंचा संत सन्मान सोहळा पहाण्यासाठी मन आतुर होणे : ‘आजचा दिवस पहाण्यासाठी माझे डोळे आणि ही आनंदवार्ता ऐकण्यासाठी माझे कान पुष्कळ आतुर झाले होते. ‘पू. दीपालीताई’ हा शब्द कधी कानावर पडतो ?’, असे मला झाले होते.
९ आ ३ आ. आईप्रमाणे सर्व साधकांवर प्रेम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या पू. दीपालीताई ! : पू. दीपालीताईंविषयी एकाच वाक्यात सांगायचे, तर ‘पू. दीपालीताई आम्हा सर्वांच्या आई आहेत.’ सोलापूर जिल्ह्यातील सर्व साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली, ती केवळ पू. दीपालीताईंच्या प्रयत्नांमुळेच ! आम्हा सर्व साधकांना त्या एवढा आधार देतात की, कुणाची आईही एवढा आधार देणार नाही.
(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.४.२०२३) (क्रमशः)
साधकांना घडवण्यासाठी सतत धडपड करणार्या पू. (कु.) दीपाली मतकर !पू. दीपालीताई यांनी आम्हा सर्व साधकांना घडवले. कधी कधी पू. दीपालीताई पहाटे ३ वाजता झोपायच्या आणि दोन-अडीच घंट्यांनी, म्हणजे पहाटे ५.३० वाजता होणार्या ‘ऑनलाईन’ व्यष्टी साधनेच्या आढाव्याला उपस्थित असायच्या. तेव्हा मला वाटायचे, ‘मलाही असे घडायला पाहिजे. पू. दीपालीताई आम्हाला घडवत आहेत; पण आम्ही घडायला न्यून पडत आहोत.’ त्यांची ‘जिल्ह्यातील साधकांनी सेवाकेंद्रात येऊन रहावे आणि त्यांना चैतन्य मिळावे’, यासाठी पुष्कळ धडपड असते.’ – सौ. सोनल कोठावळे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), बार्शी, जिल्हा सोलापूर. झोपेच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हरवणार्या पू. (कु.) दीपाली मतकर !‘सनातन संस्थेच्या सहस्रो साधकांतच काय; पण सर्वत्रच्या लाखो साधकांत इतकी अल्प झोप घेऊन सेवा करणारा दुसरा कोणीच नाही ! एवढेच काय, तर मलाही इतकी अल्प झोप घेऊन काही करण्याचा विचारही करता येत नाही. ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् ।’, हे संस्कृतमधील सुवचन आहे. त्याचा अर्थ ‘गुरूंनी शिष्याकडून पराभव व्हावा’, अशी इच्छा ठेवावी’, असा आहे. आज ती इच्छा एका अंगाने पूर्ण केल्याबद्दल मी दीपालीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२९.८.२०२३) |
स्वीकारावी आज शुभदिनी, ज्योतीने तेजाची आरती ।
श्रावण कृष्ण द्वितीया (१.९.२०२३) या दिवशी सनातनच्या ११२ व्या संत पू. दीपाली मतकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेने पू. दीपाली मतकर यांच्या चरणी वाहिलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प !
गुरु नारायण म्हणती तुम्हाला श्रीकृष्णाची गोपी ।
रमले साधका तुझ्या प्रीती ठायी जणू गोप अन् गोपी ॥ १ ॥
निष्ठा गुरुवरी असे आपली निश्चल ।
न्या तुम्ही आम्हाला श्री गुरुचरणी तात्काळ ॥ २ ॥
आहात तुम्ही प्रतीक प्रीतीचे मूर्तीमंत ।
तव प्रीतीला शरण आम्ही आलो, अवतरला जणू भगवंत ॥ ३ ॥
दर्शन घडे आपल्यात श्रीकृष्णाच्या नानाविध रूपांचे ।
जणू कृष्णच आला आमच्यासाठी, महद़्भाग्य हे आमचे ॥ ४ ॥
‘संत हे भगवंताचे सगुण रूप’ ।
अनुभवते हे क्षणोक्षणी तुमच्या ठायी ॥ ५ ॥
तेज तुम्ही अन् ज्योत असे मी ।
स्वीकारावी आज शुभदिनी, ज्योतीने तेजाची आरती ।
ज्योतीने तेजाची आरती ॥ ६ ॥
– कु. गीता व्हटकर, सोलापूर सेवाकेंद्र (२८.८.२०२३)