अलाहाबाद उच्च न्यायालयाने महिला पोलिसावरील आक्रमणाची स्वतःहून नोंद घेत रात्री केली सुनावणी !
मुख्य न्यायाधिशांनी निवासस्थानीच भरवले न्यायालय !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अयोध्येत सरयू एक्सप्रेसमध्ये एक महिला शिपाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून याची नोंद घेत ३ सप्टेंबर या दिवशी रात्री ९ वाजता विशेष खंडपीठ स्थापन करून शासकीय निवासस्थानीच सुनावणी केली. खंडपिठाने उत्तरप्रदेश सरकार आणि रेल्वे पोलीस यांना ४ सप्टेंबर या दिवशी उत्तर देण्याचा आदेश दिला होता. सरकारी अधिवक्ता ए.के. सँड यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील मागवला असून त्यांना न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगितले होते. त्यानुसार ४ सप्टेंबरला न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दोघांकडून उत्तरे देण्यात आली. आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्या पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावर पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे.
या महिला पोलीस शिपायाच्या कमरेखाली कपडे नव्हते. तिच्या चेहर्यावर चाकूने वार केल्याचे दिसत होते. ३० ऑगस्टला ही घटना घडली होती. अधिक रक्तस्राव झाल्याने महिला पोलिसाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर लक्ष्मणपुरीच्या के.जी.एम्.यू. रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, असे सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|