लाठीमाराचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला ! – ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस महानिरीक्षक
जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. हे दोन्ही अधिकारी तेथे स्वत: उपस्थित होते, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) ज्ञानेश्वर चव्हाण यांनी एका दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
ज्ञानेश्वर चव्हाण पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी चालू झालेली नाही. या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश येतील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीत किती लोक असतील ? हे मला सांगता येणार नाही. दगडफेक करणार्या ४० जणांना अटक केली आहे. महिला पोलीस आणि सैनिक घायाळ झाले आहेत. त्यांची डोकी फुटून ते रक्तबंबाळ झाले. मग शेवटी पोलीस अधिकार्यांनी लाठीमार करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. त्यासाठी आदेशाची आवश्यकता नव्हती. लाठीमार करणार्या पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याचे काहीच कारण नाही. आमच्याच ५० लोकांची डोकी फुटली. घायाळ झालेले ६४ लोक उपचार घेत आहेत.