‘चांदणी चौका’चा फेरा ?
पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या चांदणी चौकाची चर्चा सध्या पुष्कळ गाजत आहे. जुन्या रस्त्याला काढून ३९७ कोटी रुपये खर्च करून ८ रॅम्प, २ सेवा रस्ते, २ भूमीगत मार्ग, ४ पूल, १७ कि.मी. रस्ते असे त्याचे मोठे विस्तारीकरण करण्यात आले आहे. १२ ऑगस्टला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नूतन उड्डाणपुलाचे उद्घाटनही झाले; मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये कोणता मार्ग कोणत्या ठिकाणी जातो, असे फलकच काही ठिकाणी लागले नसल्याने किंवा लागलेले फलक दर्शनीय नसल्याने नागरिक आणि प्रवासी यांचा मात्र रस्ते शोधतांना गोंधळ होत आहे. ‘गूगल मॅप’ प्रणालीचा उपयोग करूनही अनेक वाहने २ अथवा अधिक वळणे आल्यावर काही क्षण थांबून ‘निश्चित कोणत्या मार्गाने वळायचे आहे ?’, याची पुनर्पडताळणी करत आहेत. आता या समस्येवर ‘आमच्याकडे चांदणी चौकातील कोणता रस्ता कुठे जातो ? याच्या शिकवण्या घेतल्या जातील !’ असा खास पुणेरी उपहासात्मक शैलीतील टीकात्मक व्हिडिओ समाजमाध्यामांतून प्रसारित झाला आहे ! एकूणच नागरिकांमध्ये या रस्त्यांविषयी पुष्कळ संभ्रम आहे. रस्ता विस्तारीकरण अन् सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने झाले आहे; परंतु मार्गांवर उद़्भवणार्या विविध समस्यांमुळे नागरिकांना अडचण होत आहे. कात्रजकडे जाणार्या वाहनांचीही हीच स्थिती आहे. हिंजवडीसारखे ‘आयटी पार्क’, तसेच चाकण, तळेगाव यांसारखी औद्योगिक क्षेत्रे या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांशी नोकरदारवर्ग हाच मार्ग वापरतो. त्यामुळे कार्यालयांच्या येण्या-जाण्याच्या विशिष्ट वेळी पुष्कळ वाहतूक कोंडी झाल्याचे अनुभवास येते.
या उड्डाणपुलाचा उद्देश साध्य होण्यासाठी रस्त्यांचे नियमन व्हायला हवे आहे. चौकामध्ये वाहतूक पोलिसांचा जमाव असल्याने कोंडी सुटली, तरी प्रत्येक वेळी पोलीस असतातच असे नाही. त्यातच रुग्णवाहिकेसारख्या अतीमहत्त्वाच्या सेवेला मार्गात अडचण येण्याचे प्रमाण अल्प झाले, अशी परिस्थिती सध्या नाही. उर्वरित काम त्वरित पूर्ण व्हायला हवे. मोठ्या मार्गदर्शक फलकांची संख्या योग्य पद्धतीने लावल्यास वाहनचालकांची गैरसोय आणि मार्गाविषयी गोंधळ होणार नाही. यात वाहतूक नियमनावर लक्ष केंद्रीत करून सर्व कामे केल्यास वाहतूक कोंडीचे प्रमाण अत्यल्प होईल. एकूणच चांदणी चौकातील रस्तेबांधणीचा चांगला प्रयत्न परिपूर्ण झाल्यास ‘चांदणी चौकाचा फेरा लवकर सुटेल का ?’ असा प्रश्न नागरिकांना विचारावा लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने गतीमानतेने प्रयत्न केल्यास ‘शिकवण्या’ ठेवू इच्छिणारे पुणेकर यातून ‘शिकण्याचा’ उपदेश करतील !
– श्री. केतन पाटील, पुणे