मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह बहुतांश मंत्री उपस्थित होते. ४ सप्टेंबर या दिवशी मराठा आरक्षणाविषयीची उच्चस्तरीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
मराठा आरक्षणविषयी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद https://t.co/EZHvWk66mV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 4, 2023
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणासाठी आम्ही कायदा केला; मात्र सरकार पालटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याला आरक्षण टिकवता आले नाही. आरक्षण रहित झाल्यानंतर त्याचा फटका बसलेल्या ३ सहस्र ७०० विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इच्छाशक्ती दाखवली नाही. मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत त्यांना इतर मागासवर्गियांप्रमाणे आर्थिक लाभ देण्यात येईल. त्यासाठी सरकार आवश्यक आर्थिक प्रावधान करील.’’
कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सरकार प्रयत्नरत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याविषयी म्हणत आहेत; मात्र ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी अध्यादेश का काढला नाही ? मराठा आरक्षणाची मागणी करणार्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे समर्थन करता येणार नाही. यामध्ये घायाळ झालेल्यांची मी सरकारच्या वतीने क्षमा मागतो.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणावरून काहीजण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत.’’