‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘इस्रो’ने ३ सप्टेंबर या दिवशी ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर बंद केले असले, तरी ‘चंद्रयान-३’द्वारे चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरला पुन्हा एकदा वर उडवले. ‘इस्रो’ने सांगितले, ‘‘विक्रम’ला त्याच्या मूळ जागेपासून ४० सेंटीमीटर वर उडवण्यात आले आणि नंतर ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर पुन्हा सुखरूप खाली उतरवण्यात आले.’’ अशा प्रकारे ‘इस्रो’कडून नवीन प्रयोग करण्यात आला. यानंतर ‘विक्रम’ची सर्व उपकरणे पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली. सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याचे ‘इस्रो’ने स्पष्ट केले. या घटनेचा व्हिडिओ ‘इस्रो’ने ट्वीट केला आहे.

या प्रयोगाचा काय लाभ होणार ?

‘इस्रो पुढील मोहिमेत चंद्रावरील माती आणि दगड पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न  करणार आहे. तेव्हा चंद्राच्या भूमीवरून यानाला पुन्हा उड्डाण करावे लागणार आहे. तेव्हा त्याची एक प्रकारे चाचणी ‘विक्रम’ला पुन्हा वर उडवण्याच्या माध्यमातून करण्यात आली. यासह भविष्यात भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याने चंद्रावर उतरलेल्या अंतराळाविरांना पृथ्वीवर परतण्यासाठी यानाला चंद्राच्या भूमीवरून उड्डाण करावे लागणार आहे. त्याची एक प्रकारे चाचपणी ‘इस्रो’ने केली आहे.