आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पण आरोग्याविषयी चिंताही करू नका !
‘काही साधक स्वतःच्या आरोग्याविषयी आवश्यकतेपेक्षा अधिक संवेदनशील असतात आणि आरोग्याविषयी चिंताही करतात. ‘माझी प्रकृती तेवढी बरी नाही; त्यामुळे मला अधिक सेवा करायला जमणार नाही’, असा आधीच ग्रह करून ठेवतात. काही साधक प्रकृती-अस्वास्थ्याचे कारण पुढे करून अधिक वेळ झोपून रहातात किंवा शारीरिक श्रमाच्या सेवांना नकार देतात. काही जणांच्या मनात ‘आपण दिसायला सुंदर असलो पाहिजे’, असे विचार असतात आणि या विचारांपोटी ‘सुंदर दिसण्यासाठी आणखी काय करता येईल ?’, यासाठी ते प्रयत्नशील असतात.
‘देह सुदृढ आणि सुंदर असणे’, हे खरे तर दैवी वरदानच आहे. ते अधिकतर आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. सध्या कालमाहात्म्यानुसार वाईट शक्तींचे त्रास वाढले आहेत आणि याचा परिणाम साधकांच्या आरोग्यावरही होत आहे. साधना चांगली होण्यासाठी आरोग्य चांगले असणे अत्यावश्यक आहे. आरोग्य बिघडू नये यासाठी किंवा व्याधी दूर होण्यासाठी आवश्यक ती काळजी अन् वैद्यकीय उपचार घ्यायलाच हवेत आणि आवश्यकतेनुसार नामजपादी उपायही करायला हवेत. याचसह आरोग्य सुदृढ रहाण्यासाठी व्यायाम, योगासने इत्यादीही करायला हवीत; मात्र आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
१. आपण करत असलेल्या साधनेचा मूळ उद्देश ‘शरीर बळकट करणे आणि सौंदर्यवर्धन’, हा नाही, तर ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हा आहे ! या उद्देशाचा आपल्याला विसर पडायला नको. ‘जशी स्थिती आहे त्या स्थितीत जितकी अधिक करता येईल तितकी साधना आनंदाने करत रहाणे’, हीच सध्याच्या आपत्काळातील साधना आहे.
२. ‘शारीरिक किंवा मानसिक व्याधी भोगण्याच्या माध्यमातून देव माझे प्रारब्ध लवकर अल्प करून मला त्याच्या चरणांशीच आणत आहे’, असा भाव ठेवल्यास मनाची अस्वस्थता किंवा नकारात्मकता अल्प होते.
३. आपल्याला असलेले विकार हे प्रारब्ध किंवा वाईट शक्तींचे त्रास यांमुळे असतात. आपण जेवढी सेवा आणि साधना अधिक करू, तेवढे आपले प्रारब्ध अन् वाईट शक्तींचे त्रास अल्प होतात. थोडक्यात ‘सेवा आणि साधना’, हाच प्रारब्ध आणि वाईट शक्तींचे त्रास अल्प करण्याचा उत्तम मार्ग आहे !
४. ‘मला अमुक सेवेमुळे त्रास होईल; म्हणून ती सेवा नको’, असा विचार करणारे साधक हा विचार करत नाही की, ‘आपण ती सेवा तळमळीने केली, तर देव आपली काळजी घेणार.’
५. ‘देवाची शक्ती अमर्याद आहे. शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे जरी माझ्या शरिराची किंवा मनाची शक्ती क्षीण झाली असली, तरी मी भाव ठेवल्यास मला देवाची शक्ती मिळणारच आहे’, असा विचार करून भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवावेत. यामुळे आपला उत्साह आणि कार्यक्षमता यांत वाढ होईल.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रतिदिन पुष्कळ थकवा असतांनाही ते एका साधकाच्या सोबत बसून संगणकावर ग्रंथांच्या संकलनाची सेवा करतात. एकदा थकवा अधिक असल्याने त्यांना बसणे शक्य होत नव्हते. तेव्हा ते साधकाला म्हणाले, ‘‘मी पलंगावर आडवे पडून ग्रंथांचे लिखाण पडताळतो !’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मातील एवढ्या उच्च पदावर असतांनाही शारीरिक स्थितीवर मात करून सेवेची जशी तळमळ दाखवतात, तशी तळमळ आपणही दाखवली, तर श्रीविष्णुस्वरूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आपल्याला सेवेसाठी शक्ती देणार नाहीत का ?
७. कित्येक साधक अशी अनुभूती घेतात की, आजारपण आणि वाईट शक्तींचे त्रास असतांनाही जेव्हा ते समर्पितभावाने तळमळीने सेवा करतात, तेव्हा त्यांना स्वतःच्या शारीरिक स्थितीची किंवा त्रासांची जाणीवही होत नाही. अशा साधकांवर देवही कृपा केल्याविना रहात नाही. सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, पू. (सौ.) मनीषा पाठक अशा कितीतरी संतांनी प्रतिकूल शारीरिक स्थिती असतांनाही तळमळीने अन् आनंदाने सेवा आणि साधना केली; म्हणून त्याचे फलस्वरूप देवाने त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करवून घेतली. आपणही त्यांचे अनुकरण केले, तर देव आपलीही आध्यात्मिक उन्नती करवून घेणार नाही का ?
८. शारीरिक किंवा मानसिक व्याधी भोगाव्या लागतांना मनाची चिडचीड होत असेल, अस्वस्थता वाढत असेल अथवा नकारात्मकता किंवा निराशा येत असेल, तर त्यासाठी मनाला स्वयंसूचना द्याव्यात आणि आवश्यकतेनुसार मानसोपचारतज्ञांचे मार्गदर्शनही घ्यावे.’
– पू. संदीप आळशी (२०.५.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |