प्रेमभाव, शिकण्याची वृती आणि उतारवयातही सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असलेल्या सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (४.९.२०२३) या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात मला झालेला लाभ येथे दिला आहे.

‘२०.५.२०२३ या दिवसापासून मला पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांच्या बाजूला सेवेला बसण्याची संधी मिळाली.पू. आजी संकलनासाठी येणार्‍या धारिकांचे टंकलेखन आणि प्राथमिक टप्प्याचे संकलन करतात. मीही संकलनाची सेवा करत असल्याने पहिल्या दिवशीच पू. (सौ.) आजी म्हणाल्या, ‘‘चांगले झाले. देवाला माझी किती काळजी आहे ! तुम्ही माझ्या बाजूला बसण्यासाठी आलात. आता मला संकलनातील अजून बारकावे सांगा.’’ त्या वेळी पू. आजींचे वय ७४ वर्षे होते. या वयातही त्यांची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ, सतत शिकण्याची वृत्ती, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला अपार भाव असे अनेक दैवी गुण मला शिकायला मिळाले.

(पू. (सौ.) शैलजा परांजपे या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या आई आहेत.)


पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (सौ.) शैलजा परांजपे

१. साधकांची प्रेमाने विचारपूस करून त्यांना आनंद देणार्‍या पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी !

‘पू. आजी आश्रमात आल्यानंतर सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात. त्या साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा लाभ  होण्यासाठी साधकांच्या समवेत बसून नामजप करतात. एखादा नेहमी येणारा साधक त्यांना उपायांसाठी दिसला नाही, तर ‘त्या संबंधित साधकाचे नाव घेऊन तो साधक घरी गेला का ? कि त्याची प्रकृती ठीक नाही ?’, असे उपस्थित साधकांना प्रेमाने विचारतात. त्यामुळे साधकांना आनंद होतो.

२. इतरांचा विचार करणे

मी एकदा त्यांना धारिकेतील र्‍हस्व, दीर्घ आणि लहान वाक्य यांतील पालट सांगत होते. तेव्हा त्या लगेच म्हणाल्या, ‘‘तुम्ही ज्या शब्दात पालट करायला सांगितले आहेत. ते शब्द मी अधोरेखित करून ठेवते. नंतर मी ते पालट पूर्ण करीन. मी आताच ते पालट केले, तर तुमचाही त्यात वेळ जाईल.’’

श्रीमती मनीषा गाडगीळ

३. ‘संकलन सेवा योग्य व्हावी’, अशी वयाच्या ७४ व्या वर्षीही तळमळ असलेल्या पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी !

३ अ. शिकण्याची वृत्ती

१. पू. आजी संकलनातील काही शब्द मला विचारून घेतात आणि लगेच लिहून ठेवतात. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला जेवढे जमेल तेवढे मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते; म्हणजे पुढचे संकलन करणारा जो साधक आहे, त्याचा थोडा तरी वेळ वाचेल. त्याला प्रत्येक शब्दात दुरुस्ती करायला नको.

२. पू. आजी भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) सेवा करतात. त्यांना काही कारणाने आश्रमात येणे शक्य नसल्यास त्या घरी सेवा करतात. एकदा त्या वैयक्तिक कामानिमित्त गावाला गेल्या होत्या. तेव्हा त्या भ्रमणसंगणक समवेत घेऊन गेल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘भ्रमणसंगणक समवेत असला, तर तेवढीच माझी सेवा तरी होईल आणि त्यातून शिकता येईल.’’ तेथेही वेळ मिळाल्यावर त्यांनी सेवा केली. या वयात भ्रमणसंगणकावर सेवा करणेे कौतुकास्पद आहे.

३ आ. सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ : एकदा मी संकलन करतांना माझ्याकडून झालेल्या चुका लिहीत होते. त्या वेळी त्या लगेच म्हणाल्या, ‘‘माझ्याही चुका मला सांगा. मीही लिहून देते. माझीही सेवा परिपूर्ण होईल.’’ एकदा मी चुकलेले शब्द २० वेळा लिहीत होते. ते त्यांनी पाहिल्यावर त्यांनीही त्यांचे चुकलेले शब्द २० वेळा लिहून काढले.

३ इ. परिपूर्ण सेवेतून आनंद अनुभवणे : एक दिवस त्यांनी मला सांगितले, ‘‘मलाही शब्द किंवा वाक्यरचना नीट केली आणि त्यात योग्य त्या सुधारणा केल्या की, मलाही परिपूर्ण सेवा केल्याचा आनंद मिळतो. ‘मी कधी एकदा आश्रमात येते आणि पुढची धारिका तुमच्याकडून शिकते’, असे आज मला झाले होते. मला पुष्कळ आनंद मिळाला.

४. ‘पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींच्या सत्संगामुळे मला पुष्कळ चैतन्य मिळते’, असे मला जाणवते. त्यांच्यातील चैतन्यामुळे सेवा करतांना माझाही उत्साह आणि आनंद टिकून रहातो.

५. पू. आजी अखंड ईश्‍वरी अनुसंधानात असतात. त्या कधीतरी माझ्याशी सहज बोलतांना ‘एखाद्या अभंगात भगवंताला कसे आळवले आहे ? त्या अभंगात त्याचे गुणगान कसे केले आहे’, याविषयी भावपूर्ण सांगतात. त्यामुळे माझेही अनुसंधान वाढण्यास साहाय्य होते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण काढताक्षणी त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. त्या म्हणतात, ‘‘आपल्या गुरूंची महती कितीही गायली, तरी न्यूनच आहे. असे आपले गुरु आहेत.’’ या आठवणीमुळे काही वेळ त्या भावावस्थेत असतात. त्यांना भावावस्थेत पाहून माझीही भावजागृती होते.

७. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (पू. आजींचे जावई) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (पू. आजींची कन्या) यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव !

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (पू. आजींचे जावई) आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (पू. आजींची मुलगी) या उभयतांविषयी त्यांच्या मनात नेहमीच कृतज्ञताभाव असतो. त्या नेहमी म्हणतात, ‘‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासारखे जावई आम्हाला लाभले आहेत, हे आमचे भाग्य आहे.’’

प.पू. डॉक्टर, ‘आपल्या कृपेमुळेच आश्रमातील सर्व साधकांना पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींसारख्या संतांचा सहवास मिळत आहे. त्याचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने आणि आर्ततेने प्रार्थना करते.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक