धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !
६ सप्टेंबर या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण म्हटले की, समस्त कृष्णभक्तांना आठवतात त्या त्याच्या अद्भुत लीला, त्याचा खोडकरपणा, त्याने केलेले युद्ध आणि त्याने भक्तांना ‘गीते’च्या माध्यमातून दिलेला भगवद्संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्णाची अद्भुत वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रखर बुद्धीवादी
‘श्रीकृष्ण जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्ये, म्हणजे तो प्रखर बुद्धीवादी होता. केवळ वेद सांगतात; म्हणून कोणतीही गोष्ट त्याने आंधळेपणाने मान्य केली नाही. बुद्धीला न पटणारी गोष्ट प्रसंगी नाकारणारा तो अत्यंत चाणाक्ष अभ्यासू होता. प्राचीन वैदिक यज्ञ संस्कृतीचा स्वीकार करतांना त्याने ब्रह्मयज्ञ, दानयज्ञ, तपयज्ञ आणि सगळ्यात शेवटी जपयज्ञ सुद्धा उच्चरवाने सांगितला. सगळीकडे वैदिक हवनीय यज्ञ होत असतांना ‘जपयज्ञ म्हणजे मी आहे’, असे सांगण्याचे धाडस केवळ कृष्णासारख्या स्वतः धर्मस्वरूप असलेल्या ईश्वरी अवताराकडूनच होऊ शकते. यावरून त्याचे प्रखर बुद्धीवादी व्यक्तीमत्त्व निश्चितपणे लक्षात येते.
महाभारत युद्ध थांबवण्याचा अंतिम उपाय म्हणून पांडवांचा दूत बनून कौरवांकडे जाऊन त्याने जी शिष्टाई केली, ती इतिहासात ‘कृष्ण शिष्टाई’ म्हणून प्रसिद्ध आहे. ती शिष्टाई ऐकण्यासाठी भारतभरातून सगळे सम्राट तिथे जमले होते. हे बघण्यासाठी की, ‘तो काय भाषण करतो ? काय शिष्टाई करतो ? त्याचे वाक्चातुर्य कसे आहे ? तो मुत्सद्दीपणे कसा वागतो ?’ श्रीकृष्णाने त्या वेळी केलेले मार्गदर्शन इतके उत्कृष्ट आहे की, ते तत्त्वज्ञान, राजकीय, सामाजिक, युद्धक्षेत्र यांमध्ये आजही आदर्शवत् ठरावे. तो म्हणाला, ‘‘कौरवांनो, आणखी काही वर्षांनी पांडव उरणार नाहीत, तुम्हीही उरणार नाही; पण ज्या कारणासाठी आपण भांडलो, ते कारण मात्र उरेल. मग आपले वंशज आपल्याला हसतील किंवा रडतील किंवा गौरवही करतील. तुम्ही केवळ त्याचा विचार करा, माझा किंवा पांडवांचा विचार करू नका.’’ एखादी गर्भित दमदाटी कशी द्यावी आणि तसे करत असतांना तत्त्वज्ञानाची बाजूही कशी योग्य समजावून सांगावी, अशासारखे सगळे उत्तम अन् धोरणी संभाषण कौशल्याचे कंगोरे त्या कृष्ण शिष्टाईमध्ये आहेत.
२. श्रीकृष्णाची समता
गोपाळ म्हणून गोकुळात वाढलेल्या श्रीकृष्णाला ‘गोपपुत्र’ म्हणून वारंवार अपमानित व्हावे लागले; परंतु स्वतः श्रीकृष्णाने कधीही जातीभेद, प्रांतभेद, लिंगभेद वगैरे कोणताही भेदाभेद केल्याचे आढळत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे अवतरण असल्यामुळे श्रीकृष्णाकडे उपजत अत्यंत समतोल बुद्धी होती. गीतेतही त्याने सांगितलेली वर्णव्यवस्था स्वभावधर्मावर आधारित आहे. त्याच्याकडे आलेल्या प्रत्येकाला सन्मान देण्याचे आणि योग्य मार्ग दाखवण्याचे काम त्याने यथायोग्य केले. मग तो सुदामा असो, विदुर असो, अक्रूर असो वा अन्य कुणीही असो. गोकुळातील त्याचे सवंगडी-मित्र हे वेगवेगळ्या जातींचे होते.
‘हरिवंश पुराण’ आणि ‘भागवत पुराण’ यांमध्ये गोकुळातील त्याच्या सर्व प्रकारच्या सवंगड्यांसह त्याने केलेल्या खोड्या, त्याने दाखवलेल्या लीलांचे वर्णन केले आहे. त्याचा नेहमीचा खेळ, म्हणजे गोपगोपींच्या घरातून दही-लोणी चोरून खाणे. त्याच्या या लीलांची भुरळ अनेक कवींना इतिहासात पडली आणि आजही ती पडते आहे. यातील मराठीतील प्रमुख नाव म्हणजे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ यांनी अनेक गवळणी, भारूडे आणि इतर काव्य प्रकार रचून या कृष्णलीलांचे अत्यंत रमणीय वर्णन केले आहे.
३. निर्मोही आणि प्रत्येक क्षणी समाजाचा विचार करणारा !
पुढे श्रीकृष्णाने अनेक राजांचा युद्धात पराभव केला. अनेक राजांना सिंहासनावरून पदच्युत केले, अनेक नवीन राजांना सिंहासनावर बसवले, मध्यस्थी करून कित्येक तंटे सोडवले; पण द्वारकेचे त्याचे राज्य वगळता तो स्वतः कधीही कुठल्याही सिंहासनावर बसल्याचे आढळत नाही. द्वारकेचे राज्यही त्याने स्वतः स्वतंत्र स्थापन केलेले राज्य होते. वस्तूतः जिंकलेल्या त्या राजांना त्याला मांडलिक बनवता आले असते; पण त्याने तसे केले नाही. तेथील राज्यव्यवस्थेची योग्य घडी बसवून आणि समाज कसा उत्तमोत्तम पद्धतीने चालेल, हा विचार करून त्याने त्या राज्यांच्या कारभारातून अलिप्तता स्वीकारली. आजही सहस्रो वर्षांनंतर कृष्णभक्ती समाजात एवढी लोकप्रिय आहे, याचे कारण म्हणजे मुळात श्रीकृष्णाने प्रत्येक क्षणी समाजाचा विचार केला. ‘सगळ्यांना मिळेल तेच सुख आपण घ्यावे’, अशी विचारसरणी ठेवून समाजावर निःस्वार्थ प्रेम करण्याचे वेड त्याने आयुष्यभर जपले आणि म्हणूनच आजही समाजाला तो वेड लावतो आहे.
४. थोर राजनीतीज्ञ
श्रीकृष्णासारखा धूर्त आणि राजनीतीज्ञ त्याच्या अगोदरही कधी झाला नाही अन् नंतरही कधी झालेला नाही. राजधुरंधर मुत्सद्दी व्यक्ती कशी असावी? तर ती कृष्णासारखी ! मानवी जीवनाच्या सर्वांगीण यशाचे अचूक मोजमाप करण्यासाठी ५ प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिले असते मानसशास्त्र, दुसरे समाजशास्त्र, तिसरे अर्थशास्त्र, चौथे राजनीतीशास्त्र आणि पाचवे तत्त्वज्ञान. ही पाचही प्रकारची दालने ज्या व्यक्तीरेखेमध्ये पूर्णपणे प्रकाशित झालेली असतात, ती व्यक्ती जीवनामध्ये सगळ्यात यशस्वी असते. श्रीकृष्णाच्या चरित्रात तो थोर मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होता आणि त्याच्या राजनीती शास्त्राविषयी, तर काही प्रश्नच नाही, असा यशस्वी होता. आचार्य चाणक्य, स्वामी विद्यारण्य, समर्थ रामदास यांच्यासारखे काही अपवाद सोडले, तर एवढे उत्तुंग व्यक्तीमत्त्व राजनीतीविषयी तरी श्रीकृष्णाच्या नंतर या भारतवर्षात झालेले आढळत नाही. प्रत्येक कृती मागच्या त्याच्या हेतूचा मागोवा घेतला, तर त्याची थोरवी लक्षात येते.
५. कुशल कर्मवादी
श्रीकृष्ण व्यक्तीमत्त्वाचे पुढचे वैशिष्ट्य, म्हणजे तो अत्यंत कुशल कर्मवादी होता. गीतेमध्ये ‘योग’ शब्दाची व्याख्या करतांना त्याने सांगितले आहे, ‘कर्म करण्याचे कौशल्य म्हणजे योग.’ ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे.’ ते कौशल्य त्याच्याकडे निश्चितपणे होते किंबहुना तो अद्भुतकर्मा होता ! म्हणजे तो चमत्कारप्रवण होता एवढाच याचा अर्थ नाही. वस्तूतः कृष्णचरित्रामध्ये विशेषतः भागवत पुराणामध्ये त्याच्या नावावर अनेक चमत्कार दाखवलेले आढळतात. त्यात द्रौपदीचे लज्जारक्षण; कंस, शिशुपाल, जरासंध आणि शेवटी दुर्योधनाचा वध वगैरे सर्व कथांमध्ये चमत्कारांचे वर्णन पुरेपूर आहे.
तो योगेश्वर, कर्मकुशल, अद्भुतकर्मा असला, तरी या लीला त्याने ज्या हेतूसाठी केल्या, तो हेतू अतीउच्च आणि मुख्य म्हणजे निःस्वार्थ होता, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये व्यक्तीगत स्वार्थाचा लवलेश नव्हता. केवळ व्यक्तीगत प्रसिद्धीसाठी किंवा संकटे टाळण्यासाठी त्याने ते चमत्कार कधीही दाखवले नाहीत.
६. धैर्यवान
खरेतर कृष्णाच्या जन्माचा प्रारंभच मुळी संकटे स्वीकारण्यापासून झाली आहे. ही संकटांची परंपरा पुढे आयुष्यभर चालू राहिली. लहानपणी गोकुळात अनेक बाललीला दाखवणारा कृष्ण १४ व्या वर्षी मथुरेला गेला आणि एकदम मोठा राजनीतीज्ञ बनला. १४ व्या वर्षी त्याने कंसाच्या दरबारात जाऊन त्याच्याशी मलयुद्ध केले. तेवढ्या कोवळ्या वयातही त्याने संकटे टाळण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने संकटांशी कायम लढा दिला. संकटाला तो धैर्याने सामोरे गेला.
त्याच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे निर्भयता ! तो भयग्रस्त झाल्याचे वर्णन आढळत नाही. आणखी एक म्हणजे उभ्या आयुष्यात त्याने कधीही अश्रू ढाळल्याचा उल्लेख कृष्णचरित्रात आढळत नाही. संकटांमुळे कधीही न ढळणारा प्रखर कर्मवाद प्रत्यक्षात जगून मगच त्याची शिकवण त्याने उभ्या जगाला दिली. म्हणून तो ‘योगेश्वर कृष्ण’ म्हणवला गेला.
(क्रमशः उद्याच्या अंकात)
– प.पू. बापटगुरुजी
(साभार : मासिक ‘संतकृपा’, जून २०१५)