पोलीस तपासणी नाकी मलिदा खाण्यासाठीच आहेत का ? – बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी
गोवा राज्यातील युवतीचा मृतदेह आंबोली घाटात आणून टाकल्याचे प्रकरण
सावंतवाडी – गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ? आणि या रस्त्यावर जी पोलीस तपासणी नाकी आहेत, ती केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का? असा संतप्त प्रश्न सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
गोवा राज्यातील एका तरुणीचा मृतदेह आंबोली घाटात आणून टाकण्यात आला. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे आंबोली अपकीर्त होत असून येथील पर्यटनावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना ३ पोलीस चौक्या लागतात. यापूर्वी आम्ही आंबोली येथील आंबोली-आजरा आणि आंबोली-बेळगाव या मार्गावर पोलीस तपासणी नाका उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस तपासणी नाकी चालू करण्यात आली; मात्र आता ही तपासणी नाकी बंद आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामान्य जनता आणि पर्यटक यांची पोलीस चौकीवर कसून चौकशी केली जाते. वाहतूक पोलीस प्रत्येक गाडी उघडून तपासतात, तरीही मृतदेह गाडीतून नेतांना पाेलिसांना समजत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे मद्याची वाहतूक करणार्या अनेक गाड्या या पोलीस तपासणी नाक्यावर जातात आणि नंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सापडतात, या तपासणी नाक्यांवर असलेले पोलीस कर्मचारी नेमके काय करतात ? सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.