व्याघ्रक्षेत्राबाहेरील बफर झोनचा वापर शेतीकरता करता येईल ! – राजेंद्र केरकर
पणजी, २ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या म्हादईपासून खोतीगावपर्यंतचा पट्टा व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. उरलेला जो भाग म्हणजे बफर झोन आहे, तिथे लोक शेती आणि बागायती करू शकतात, अशी आश्वासक माहिती पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिली आहे.
सौजन्य गोवा न्यूज हब
केरकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने जे गोव्यात राखीव व्याघ्रक्षेत्र घोषित केले आहे, त्याविषयी लोकांमध्ये गैरसमज आहेत. आपल्याला निसर्ग वाचवायचा असेल, तर एक उपाय म्हणजे व्याघ्रक्षेत्र राखीव करणे होय. गोव्यातील तापमानात जो पालट होत आहे, त्याच्याशी संघर्ष करण्यासाठी वनक्षेत्र वाचवणे आवश्यक आहे. लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच केंद्र सरकारच्या स्तरावर निधी उपलब्ध केला जातो. राखीव व्याघ्रक्षेत्रात रहाणार्या कुटुंबांचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्यांना केंद्र सरकारकडून १३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते. तसेच त्यांच्या भूमी गेल्या, तर त्यांचेही पुनर्वसन करण्यात येईल. कारण निसर्ग सुरक्षित राहिला, तर आपल्याला पाणी वगैरे आवश्यक तेवढे मिळून आपले जीवन समृद्ध राहील. म्हादई आणि नेत्रावळी या भागांत जवळपास १८ खाणी आहेत. या खाणींमुळे काणकोणमधील डोंगरांची दुरवस्था होऊन तिथे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे निसर्ग वाचवणे आवश्यक आहे.