क्रीडा खात्याकडून शिक्षकाला पोलीस कोठडीत असतांनाच निलंबनाचा आदेश
फातर्पा येथील शाळेतील लैंगिक शोषणाचे प्रकरण
मडगाव, २ सप्टेंबर (वार्ता.) – फातर्पा येथील शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतांनाच क्रीडा खात्याकडून त्याला १ सप्टेंबर या दिवशी त्याच्या निलंबनाचा आदेश देण्याचा निराळा प्रकार घडला आहे.
सौजन्य ओहेरलडो गोवा
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून ३१ ऑगस्ट या दिवशी निलंबनाचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. संबंधित शिक्षक गावकर याला प्रथमवर्ग जिल्हा न्यायदंडाधिकार्यांसमोर नेण्यात आल्यानंतर त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. कुंकळ्ळी पोलिसांनी संबंधित शाळेत आतापर्यंत १३ विद्यार्थ्यांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. या शिक्षकाविरुद्ध प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ‘त्याने एका अल्पवयीन मुलीचा हेतूपूर्वक हात धरला, तसेच या शिक्षकाने तिच्या भ्रमणभाषवर अश्लील छायाचित्रे पाठवली’, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी या शिक्षकाचा भ्रमणभाष कह्यात घेतला आहे. या सर्व प्रकाराची नोंद घेऊन फातर्पा-किटल या ग्रामपंचायतीने ‘या शिक्षकाला त्वरित नोकरीतून काढून टाकावे’, अशी मागणी करण्यासाठी एक तातडीची बैठक बोलावली आहे.