विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे

शैलेश झिंगडे

पणजी, २ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या काही शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याविषयीच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यामध्ये लैंगिक शोेषणाच्या विरोधात स्थापन केलेल्या समित्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असल्याची माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे.

ते म्हणाले, ‘‘कायद्यानुसार सर्व शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या काही काळाच्या अंतराने बैठका झाल्या पाहिजेत. या समित्या सक्रीय होण्यासाठी शिक्षण खात्याने कार्यवाही चालू केली आहे. लैंगिक शिक्षण कायदा, शिक्षेचे स्वरूप, तक्रार आल्यानंतर करण्याची कार्यवाही यांविषयीची माहिती या समितीच्या सदस्यांना असणे आवश्यक आहे. सध्या समित्या स्थापन झाल्या असल्या, तरी या समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य यांना समितीच्या कामाविषयी माहिती नाही. कायदा किंवा कायद्यातील कलमे यांची माहिती अधिवक्ते किंवा पोलीस यांना असते. शाळेतील शिक्षक आणि शिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांना कायदा ठाऊक असत नाही. या करता या समित्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. व्ही.एम्. साळगावकर महाविद्यालयाचे प्राध्यापक या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. सध्या तिसवाडी तालुक्यात कार्यशाळा चालू करण्यात आल्या आहेत. यानंतर बार्देश, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा आणि सासष्टी तालुक्यांमध्ये कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.’’ (केवळ कायद्याची माहिती मिळाल्यावर विनयभंगाची प्रकरणे थांबणार आहेत का ? अशा वरवरच्या उपाययोजना नव्हेत, तर घटना घडूच नयेत, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्‍या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?