जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे महाराष्ट्रात हिंसक पडसाद !
१५ बसगाड्यांची जाळपोळ; ३७ पोलीस अन् २० आंदोलक घायाळ !
जालना – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (तालुक अंबड) येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत लहान मुले आणि महिला यांच्यासह एकूण २० आंदोलक घायाळ झाले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे महिला पोलिसांसह ३७ पोलीस घायाळ झाले. त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय आणि जालना येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या वेळी संतप्त जमावाने १५ बसगाड्यांची जाळपोळ केली. जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत.
या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल भडकवणे आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे यांसाठी १६ प्रमुख आंदोलकांसह ३०० ते ३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Maharashtra: जालना में हिंसक हुआ मराठा आंदोलन, पत्थरबाजी में पुलिसकर्मी हुए घायल#maharashtranews #marathaprotest #bharatexpress pic.twitter.com/bdPWSUyf0u
— Bharat Express (@BhaaratExpress) September 2, 2023
२९ ऑगस्ट या दिवशी शहागड येथे ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. त्याची नोंद न घेतल्याने मनोज जरांडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० जणांनी बेमुदत उपोषण करण्यास प्रारंभ केला होता. १ सप्टेंबर या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण देत प्रशासन जरांगे-पाटील यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह उपोषणस्थळी आले. जरांगे-पाटील यांनी रुग्णालयात भरती होण्यास नकार दिला. या वेळी उपोषणस्थळी लोकांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे पोलिसांनी हे आंदोलन चिघळू नये, यासाठी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
फुलंब्री (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे सरपंचाने स्वत:ची कार जाळली !
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी राज्य सरकारचा निषेध करत स्वत:चे कार पेटवली. या वेळी साबळे यांच्यासह मराठा आंदोलक उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. माध्यमांशी बोलतांना मंगेश साबळे म्हणाले की, आमच्या लोकांवर आक्रमण होणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू. सरकारने २ दिवसांत लाठीमार करणार्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ.
महाराष्ट्र के जालना में मराठा आंदोलन के दौरान हिंसा; एसपी समेत 5 पुलिसकर्मी घायल, पथराव और लाठीचार्ज#Maharashtra #Jalna https://t.co/U8NiUVw8u1
— Hindustan (@Live_Hindustan) September 2, 2023
छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाचा ‘रस्ता बंद’ आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर येथे २ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता सिडको बसस्थानक चौक येथे मराठा समाजाच्या वतीने ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्य सरकार आणि पोलीस-प्रशासन यांच्यावर ते हुकूमशाही धोरण राबवत असल्याचा आरोप करत त्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
सोलापूरहून मराठवाड्याकडे जाणारी एस्.टी. सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
१. मराठा आरक्षण राजकारणाचा विषय नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लाठीमाराच्या घटनेची चौकशी करण्याचा आदेश मी दिला आहे. दगडफेकीत बरेच पोलीस कर्मचारी घायाळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जर लाठीमार केला नसता, तर पोलिसांना पुष्कळ वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.
२. पोलिसांची चौकशी करणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
बळाचा अपवापर करत जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
३. महाराष्ट्रात सध्या हुकूमशाही चालू आहे ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्रात सध्या हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खाते यांचे राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते; परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलीस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर लाठीमार केला आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे.
४. देवेंद्र फडणवीस यांचे त्यागपत्र घ्यावे ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
या प्रकरणी दोषींवर कारवाई करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यागपत्र घ्यावे.
५. सरकारने एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? – राज ठाकरे, मनसे
या आंदोलनाच्या प्रकरणी सरकारने एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? मराठी माणसाच्या कोणत्याही आंदोलनाला मनसेचा पाठिंबा आहे.
#जालना येथील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना. नागरिकांनी शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. pic.twitter.com/VLf9ylNpX7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 2, 2023
अन्य घडामोडी
१. ‘धाराशिव बंद’चे आवाहन करूनही दुकाने चालू ठेवल्याने मराठा समाजाच्या महिला आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
२. छत्रपती संभाजीनगर येथे मध्यरात्री १२ वाजता मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर आगारची बस जाळण्यात आली, तर सिडको बसस्थानकात एका बसची तोडफोड करण्यात आली.
३. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा फाटा येथे कन्नड-वैजापूर रस्त्यावर राज्य सरकारच्या निषेधार्थ १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.
४. खासदार उदयनराजे भोसले आणि ‘स्वराज्य संघटने’चे छत्रपती संभाजीराजे यांनी अंतरवाली सराटा गावातील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाविषयी माहिती जाणून घेतली.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन !
सोलापूर – सकल मराठा समाज, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी आक्रमणाच्या निषेधार्थ आज, ३ सप्टेंबर या दिवशी ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर शहर, करमाळा, माढा, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.
ठाणे येथे मराठा समाजाकडून मोर्च्याद्वारे पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध !
ठाणे, २ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत मराठा समाजाच्या वतीने ठाणे येथे मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समन्वयक समितीच्या वतीने येथील मासुंदा तलाव भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमून प्रथम तेथे दर्शन घेतले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा नेत घटनेचा निषेध करण्यात आला. त्या वेळी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असूनही अशा घटना घडत असतील, तर त्या निंदनीय असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, तर मराठा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल’, अशी चेतावणी देण्यात आली.
वाशी येथे निदर्शने !
नवी मुंबई, २ सप्टेंबर (वार्ता.) – वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. महासंघाचे नेते तथा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी याचे नेतृत्व केले. ‘लाठीमार करणार्या पोलीस अधिकार्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे’, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. या वेळी दुचाकी फेरी काढून नंतर चौकसभा घेण्यात आली.