‘आदित्य’भेट ।
नमो भास्करा तुझ्या भेटीसी ‘आदित्य’यान येईल ।
भारतभूचे विज्ञानातील हे पुढे असे पाऊल ।।
अनादी काळापासून आमचा तू जीवनदाता ।
तुझ्या हितगुजासाठी आम्ही बहू आतुरलो आता ।।
चंद्रयानच्या यशामागुती सूर्य भेटीचा प्रण ।|
गुपिते तुझी तू उघडूनी दावी हीच इच्छा जाण ।।
सदैव तुझे दर्शन घेईल ‘आदित्य’ स्थिर राहून ।
वर्णगोल अन् दीप्तीगोलही किरीट तुझा पाहून ।।
प्रचंड तुझ्या झळा सोसूनी ताप तुझा साहील ।
निरीक्षण तुझे अव्याहत ते नवज्ञान आम्हा देईल ।।
विज्ञानाचे करू संशोधन अंतरात डोकावू ।
प्रयोगशाळेमाजी रमतो मंदिरातही जाऊ ।।
बोलले श्री सोमनाथ प्रमुख जे अंतरिक्ष संस्थेचे ।
निर्भीडतेने सत्य शोधती यत्न बहु मोलाचे ।।
हीच कामना धरूनी आखली सूर्यशोध मोहीम ।
विकसित भारत पुढे चालतो प्रगतीचा सोपान ।।
– प्रा. बाबासाहेब सुतार, रत्नागिरी. (१.९.२०२३)