सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा
सातारा, २ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुढे म्हणाले की, सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी काळजी घ्या. या वर्षी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवूया, उदा. मतदार नोंदणी कार्यक्रम, विविध शासकीय योजना आदी. मंडळांनी पर्यावरण आणि प्रदूषण यांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि मंडळांनीही याला प्रोत्साहन द्यावे. मंडळांना लागणार्या अनुमतींसाठी ‘एक खिडकी योजना’ सिद्ध करण्यात येईल. याविषयी सातारा नगरपालिकेने ‘लिंक’ निर्माण करून त्या माध्यमातून अनुमती द्याव्यात. विद्युत् विभागाने विद्युत् तारांचे सर्वेक्षण करून धोकादायक तारांची दुरुस्ती करावी. प्रांताधिकार्यांनी येत्या १० दिवसांच्या आत ही कामे पूर्ण करून पुन्हा आढावा बैठक घ्यावी.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले की, वर्गणीविषयी समाजात कुठे बळजोरीचे प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मंडळांनीही समाजकंटकांना मंडळापासून दूर ठेवण्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करावा. |