धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन
६ सप्टेंबर या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
सध्या बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक आदी व्यक्ती हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता आणि महापुरुष यांवर टीका करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात. अशा टीकांचा योग्य तो प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते, तसेच धर्महानीही होते. ‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे. भगवान श्रीकृष्णावरील टीका पुढे ‘आक्षेप’ या मथळ्याखाली आणि त्यानंतर त्या अयोग्य विचारांचा प्रतिवाद ‘आक्षेपाचे खंडन’ या मथळ्याखाली दिला आहे.
लेखक : श्री. दुर्गेश ज. परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
आक्षेप क्र. १
‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’ असे संतवचन असतांना श्रीकृष्णाने मात्र दुर्याेधनादी कौरवांना दया दाखवली नाही ! : श्रीकृष्ण स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणवून घेतो. अशा अवताराने शांतता प्रस्थापित करण्याऐवजी अर्जुनाला भडकावले. अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते, तरीही श्रीकृष्णाने त्याचा बुद्धीभेद करून त्याला आप्तस्वकियांच्या विरुद्ध लढायला लावले. या युद्धात लाखो सैनिक प्राणांस मुकले. त्यांच्या स्त्रिया विधवा झाल्या. हे सारे करून हा नामानिराळा राहिला ! अहिंसा हा परम धर्म असलेल्या या देशाची थोर परंपरा या लबाड आणि कावेबाज श्रीकृष्णाने धुळीला मिळवली. भारतियांच्या अहिंसा धर्माला खरी बाधा यानेच आणली. अहिंसा म्हणजे दया दाखवणे ! श्रीकृष्णाने दुर्याेधनादी कौरवांना दया दाखवायला हवी होती. ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’, असे संतवचनच आहे.
आक्षेपाचे खंडन
अ. दयेत दुष्टांचे निर्दालनही सामावलेले आहे ! : भगवान श्रीकृष्णावर आक्षेप घेणार्यांनी संतवचनाचा दाखला देऊन आमचे काम सोपे केले आहे; मात्र त्यांनी संतवचनाचा अर्धाच भाग सांगितला आहे. ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’ या वचनाचे पुढचे चरण आहे, ‘आणिक निर्दाळण कंटकांचे ।।’, म्हणजे ‘केवळ प्राणिमात्रांवर प्रेम करणे, म्हणजे दया नसून ‘दुष्टांचे निर्दालन’ हीसुद्धा दयाच आहे.’ ‘दया’ म्हणजे भूतांचे (प्राणीमात्रांचे) पालन करणे; तथापि दयेचा सूक्ष्म विचार केल्यास असे लक्षात येते की, दयेत दुष्टांचे निर्दालनही सामावले आहे ! खरे विचारवंत स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर विचार करतात; कारण धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत. त्यामुळे एखाद्या गहन विषयाचा सूक्ष्म विचार केल्याविना मतप्रदर्शन करणे, म्हणजे मनाने वाईट असलेल्या आणि रूपाने बरा दिसणार्या माणसाची स्तुती केल्यासारखे आहे !
आ. कौरव ५ गावेही पांडवांना देण्यास सिद्ध नसल्याने श्रीकृष्णाने युद्धाचा निर्णय दिला ! : ‘भारतीय दंड विधाना’च्या कलम ३०० मध्ये खुनाच्या व्याख्येत ‘दुसर्याला ठार मारणे, म्हणजे खून करणे’ एवढाच स्थूल विचार केलेला नाही, तर ‘आत्मरक्षणासाठी जर एखाद्याने दुसर्याला ठार मारले, तर तो खून होत नाही’, हा सूक्ष्म विचारही केला आहे. अशा सूक्ष्म दृष्टीने विचार केल्यास समजून येईल की, ‘श्रीकृष्णाने युद्धाचा निर्णय देणे’, हे अहिंसेच्या विरुद्ध नव्हते.
कौरवांनी पांडवांवर कमालीचा अन्याय केला होता. कपटाने खेळलेल्या द्युतात पांडवांचे राज्य हरण करण्यात आले. त्यांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. या १३ वर्षांनंतर त्यांचे राज्य परत करण्याचे कौरवांनी मान्य केले होते; पण पांडवांचे राज्य परत करण्यास त्यांनी नकार दिला. आपापसांत तडजोड व्हावी; म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाई केली. शिष्टाईच्या वेळी श्रीकृष्णाने ‘कौरव जर पांडवांना त्यांचे संपूर्ण राज्य देण्यास सिद्ध नसतील, तर त्यांनी ५ गावे तरी द्यावीत’, असा प्रस्ताव मांडला. यामागे त्याचा युद्ध टाळण्याचा प्रयत्न होता. कौरवांनी हा प्रस्तावही लाथाडला आणि ‘युद्ध केल्याविना आम्ही पांडवांना ५ गावेच काय सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील, तेवढीही भूमी देणार नाही’, असे सांगितले. अशा परिस्थितीत न्याय प्रस्थापित करण्यासाठी युद्धावाचून अन्य पर्याय उरला नाही; म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याचा निर्णय दिला.
आक्षेप क्र. २
कृष्णाने अर्जुनाकरवी अन्यायाने आणि अनैतिकतेने ‘महात्मा’ कर्णाचा वध केला ! : श्रीकृष्ण अत्यंत कपटी होता. न्याय, नीती आणि धर्म यांची त्याला चाड नव्हती. त्याच्या मनात कर्णाविषयी द्वेष होता. युद्धाच्या वेळी कर्णाचा रथ भूमीत रुतला होता. कर्ण रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, ‘अर्जुना, तू कर्णावर शरसंधान कर. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.’ कर्णाच्या रथाचे चाक रणभूमीत रुतले असतांना त्याच्यावर बाणांचा वर्षाव करायला लावून कर्णाच्या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी असणारा कृष्ण ‘धर्मसंस्थापनेसाठी झालेला अवतार आहे !’, यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ? अधर्मी कृष्णाने महात्मा कर्णाचा कपटाने घात केला !
आक्षेपाचे खंडन
अ. द्रौपदीला भर सभेत आणून विवस्त्र करण्याची कल्पना केवळ कर्णाची होती ! : आजकाल कर्णाला ‘महात्मा’ बनवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. खलनायकाला नायक बनवण्याची एक टूमच निघाली आहे. ‘सर्व सद्गुणांचा रस काढून तो रस एका मुशीत ओतला आणि त्यातून जी सद्गुणांची मूर्ती साकार झाली, ती मूर्ती म्हणजेच कर्ण !’, असे सांगणारी काही पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. कर्णाचे उदात्तीकरण करणार्यांनी त्याची वकिली चांगली केली आहे; पण ‘त्यांचा महाभारताचा अभ्यास चांगला आहे’, असे म्हणता येणार नाही.
द्युताच्या वेळी धर्मराजाने द्रौपदीला पणाला लावले. त्यात तो हरला. द्रौपदीला पणाला लावताच भीष्म, द्रोण, कृप आणि विदुर यांच्यासारखे सर्व सज्जन हळहळले. महाभारतात व्यासांनी याविषयी म्हटले आहे, ‘धिग्धिगित्येव वृद्धानां सभ्यानां नि:सृता गिर: ।’ (महाभारत, पर्व २, अध्याय ५८, श्लोक ३८), म्हणजे ‘धिक्कार असो ! धिक्कार असो !, अशी वाणी वृद्ध सभासदांच्या तोंडून बाहेर पडली.’ कर्ण मात्र आनंदित झाला. द्रौपदीला भर सभेत आणून विवस्त्र करण्याची कल्पना ना दुर्याेधनाची होती ना दु:शासनाची होती ! ‘द्रौपदी एकवस्त्रा असो वा विवस्त्र, तिला सभेत आणले पाहिजे !’, ही कल्पना कर्णाची होती. दु:शासन रजस्वला आणि एकवस्त्रा असलेल्या द्रौपदीला राजसभेत घेऊन आला. तेव्हा कर्ण मोठ्याने ओरडून म्हणाला, ‘‘पांडवानां च वासांसि द्रौपद्याश्चाप्युपाहर ।’ (महाभारत, पर्व २, अध्याय ६१, श्लोक ३८), म्हणजे ‘पांडव आणि द्रौपदी या दोघांचीही वस्त्रे हिसकावून घे.’’ द्रौपदीला भर सभेत विवस्त्र करू पहाणारा कर्ण ‘महात्मा’ कसा ?
आ. कर्णाने त्याच्यासाठी सिद्ध ठेवलेल्या दुसर्या रथाचा उपयोग करण्याऐवजी मुद्दामहून त्याच्या रथाचे चाक भूमीतून काढण्याचा वेळकाढूपणा केला ! : कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले होते. तेव्हा कर्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘थोडा वेळ थांब. मी माझ्या रथाचे चाक काढतो.’’ त्या वेळी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना, युद्ध थांबवू नकोस. ते चालूच ठेव.’’ युद्धापूर्वी कर्णाने दुर्याेधनाला सांगितले होते, ‘‘दुर्याेधना, ‘ऐन युद्धाच्या वेळी माझ्या रथाचे चाक भूमीत रुतेल’, असा मला शाप देण्यात आला आहे. त्यामुळे तसा प्रसंग आलाच, तर उत्तम घोडे जोडलेले उत्कृष्ट रथ माझ्या रथाच्या मागे सतत असावेत.’’
कर्णाची ही विनंती मान्य करून दुर्याेधनाने त्याच्यासाठी तसे रथ सिद्ध ठेवले होते. कर्णाने त्याच्या रथाचे चाक भूमीतून काढण्याऐवजी त्याच्यासाठी सिद्ध ठेवलेल्या अन्य रथांपैकी एका रथाचा उपयोग का केला नाही ? त्या वेळच्या युद्धाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर युद्ध थांबत असे. कर्णाच्या रथाचे चाक रुतले, तेव्हा सूर्यास्ताची वेळ समीप आली होती. ते जाणून मुद्दाम वेळ काढण्यासाठी कर्णाने अन्य रथाचा उपयोग केला नाही. तो रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न करू लागला. ‘चालू असलेले युद्ध या निमित्ताने थांबवायचे आणि दुसर्या दिवशी ताजेतवाने होऊन युद्ध करायचे’, हा त्याचा हेतू होता. कर्णाची ही लबाडी श्रीकृष्णाने ओळखली; म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘कर्णाशी युद्ध कर’, असा निर्णय दिला. कर्ण पांडवांशी न्यायाने आणि नीतीने वागला नव्हता. अन्यायाने आणि अनैतिकतेने वागणार्याशी न्यायाने अन् नैतिकतेने वागून चालत नाही. ‘ठकाशी महाठक’ या न्यायाने श्रीकृष्ण वागला आणि त्याने अर्जुनासही तसेच वागायला सांगितले !
(श्री. दुर्गेश परुळकरलिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या लवकरच प्रकाशित होणार्या सनातनच्या ग्रंथातून)