गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवसाला एक बलात्कार किंवा अपहरण

पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात मागील ४ दिवसांत विनयभंगाच्या ६ घटना घडल्या आहेत. मागील साडेपाच वर्षांच्या आकडेवारीनुसार गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवशी बलात्कार किंवा अपहरण याचे एक प्रकरण नोंद झाले आहे. संपूर्ण गोव्यात वर्ष २०१८ पासून आतापर्यंत बलात्काराची ३९४ प्रकरणे, तर अपहरणाची ३८५ प्रकरणे नोंद झालेली आहेत. मागील ऑगस्ट मासात बलात्काराची ६, विनयभंगाची १२, अपहरणाचे १ आणि एका महिलेची हत्या, अशा प्रकरणांची नोंद झालेली आहे. विनयभंगाच्या १२ प्रकरणांमधील ५ प्रकरणांत शाळेतील शिक्षकांवर आरोप आहे. एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत गोव्यात विनयभंगाची एकूण ५७ प्रकरणे नोंद झालेली आहेत. काही प्रकरणांमध्ये राजकारणी गुन्हेगारांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असल्याने गुन्हेगार निर्ढावतात, अशा प्रतिक्रियाही समाजातून उमटत आहेत. (अशा लोकप्रतिनिधींनाही शिक्षा करावी ! – संपादक)

आजोबांकडून नातीचा विनयभंग

फोंडा – आपल्या अल्पवयीन मुलीचा सासर्‍याने विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने फोंडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. ही महिला स्वतंत्र रहाते आणि तिची २ मुले तिच्या पतीसमवेत रहातात. सासर्‍याने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (अनैतिकतेचा कळस ! शासनकर्त्यांनी आतापर्यंत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! – संपादक)

विद्यालयांमध्ये विनयभंगाच्या प्रकरणांमुळे पालकवर्ग चिंतेत

राज्यातील विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, त्यांचा विनयभंग आणि सतावणूक अशा घटना घडत आहेत. आतापर्यंत राज्यभरात ८ शिक्षकांच्या विरोधात ६ प्रथमदर्शनी अहवाल नोंद झालेले आहेत. या घटनांविषयी पालकवर्गाने चिंता व्यक्त केली आहे. ‘विद्यालयांच्या व्यवस्थापनाने अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्यार्थिनींना तक्रार करण्यास सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक विद्यालयामध्ये लैंगिक सतावणूक विरोधी समिती स्थापन करावी’, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस म्हणाले, ‘‘शैक्षणिक संस्थांनी शाळांमध्ये तक्रारींसाठी ‘सुरक्षा पेटी’ ठेवावी. लैंगिक शोषणासंबंधी तक्रारीसाठी शिक्षण खात्याने एक ‘हॉटलाईन’ चालू करावी, तसेच तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र ई-मेल चालू करावा, अशी मागणी केली आहे.’’

मडकई येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अन्य एक शिक्षक यांच्या विरोधातही ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट

म्हार्दाेळ पोलिसांनी मडकई परिसरात एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अन्य एक शिक्षक यांच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सूचनेवरून पोलिसांनी ही कृती केली आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनीने विनयभंगाचे प्रकरण प्रथम विद्यालयात इतिहास शिकवणारे शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक यांना सांगितले होते; मात्र त्यांनी ५ मास हे प्रकरण पोलिसांना कळवले नाही. विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अन्य एक शिक्षक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे आणि यावर ५ सप्टेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. म्हार्दाेळ पोलिसांनी यापूर्वी १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी विद्यालयाच्या ‘पीई’ (शारीरिक शिक्षण) शिक्षकाच्या विरोधातही ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. संशयित ‘पीई’ शिक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून यावर ५ सप्टेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.

वेश्यावस्ती चालू करण्याची मागणी दुर्दैवी ! – अन्याय रहित जिंदगी

पणजी – राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याने सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी राज्यात वेश्यावस्ती चालू करण्याची मागणी केली होती. याविषयी महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणार्‍या ‘अन्याय रहित जिंदगी’ या संस्थेचे अध्यक्ष अरुण पांडे म्हणाले, ‘‘पुरुषांची लैंगिक भूक भागवण्यासाठी वेश्यावस्ती चालू करण्याची मागणी करणे, दुर्दैवी आहे. अशी मागणी करणार्‍या कार्यकर्त्या महिलांच्या उत्कर्षासाठी काम करतात, असे म्हणता येईल का ? राज्यातील लैंगिक अत्याचार आणि वेश्याव्यवसाय यांचा काहीच संबंध नाही. बायणा वेश्यावस्ती पाडल्यानंतर वास्को शहरात बलात्कार वाढल्याच्या घटना दिसून आलेल्या नाहीत.’’

संपादकीय भूमिका 

  • गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !
  • सामाजिक माध्यमांतील अश्लील पोस्ट, मुलांच्या हाती पौगंडावस्थेतच भ्रमणभाष देणे, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपट यांतील अश्लील उत्तेजक दृश्ये या सर्व गोष्टी समाजाच्या नैतिक अधःपतनाला कारणीभूत आहेत.
  • अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या अनैतिकतेला पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी हेही महिलांवरील अत्याचाराला उत्तरदायी आहेत !