ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३ मध्ये सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था !

  • दीड वर्षापासून स्वच्छतेसाठी कंत्राटदारच नाही !

  • नागरिकांवर उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ

ठाणे, १ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मधील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतेअभावी दुरावस्था झाली आहे. मागील दीड वर्षापासून स्वच्छतेसाठी तेथे कंत्राटदारच नाही. ‘कंत्राटदार न नेमणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी’, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात हेमंत मोरे यांनी म्हटले आहे की,

१. केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली होती. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य हे उघड्यावर शौच न करणे आणि शौचमुक्त भारत असे होते; परंतु ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रभाग क्र. ३ मधील सार्वजनिक शौचालयांचा वापर करणार्‍या नागरिकांना उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ आली आहे.

२. कंत्राटदाराअभावी कामे होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साथीचे रोग पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. स्वच्छतेच्या संदर्भात ठाणे महानगरपालिका अतिशय उदासीन असल्याचे यातून लक्षात येते. तरी यावर तात्काळ उपाययोजना करावी.

संपादकीय भूमिका 

  • ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पहाणार्‍या देशातील एका राज्यातील एका शहरातील शौचालयांची अशी दुःस्थिती होते, याचा सरकारने विचार करावा !
  • या समस्येकडे दुर्लक्ष करणारे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !