गुरुदेवांच्या स्थूल रूपातील सेवेची ओढ मनात निर्माण होणे अन् त्यांनी ‘नामजपा’तूनच ते समवेत असल्याची जाणीव करून देणे
१. स्थूल रूपात गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव रहावी, यासाठी मन अधीर होणे
‘माझे मन रिकामे असेल, त्या वेळी माझ्या मनात विचार येऊन जात असे, ‘गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व किंवा रूप मला कुठेही अनुभवता येत नाही. गुरूंची स्थुलातून सेवा करण्याची संधी मिळत नाही. स्थूल रूपातील गुरुसेवेचे भाग्य आपल्याला नाही.’ या विचाराने माझे मन अधीर व्हायचेे. या सर्व क्रिया अंतर्मनात चालू असतांना बाह्यमनात मात्र नामजप चालू रहायचा. असे काही दिवस चालू होते.
२. मनात गुरूंचे अस्तित्व अनुभवण्याची इच्छा शिगेला पोचणे आणि भावसत्संगात ‘प.पू.’ हा नामजप करायला सांगितल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवणे
‘माझ्या मनात गुरूंचे सान्निध्य अनुभवण्याची आणि त्यांचा स्पर्श वा दर्शन मिळावे’, ही आशा शिगेला पोेचली असतांना एके दिवशी आश्रमस्तरावर चालू असलेल्या भावसत्संगात ‘प.पू.’ हा नामजप करायला सांगितला. त्या वेळी परात्पर गुरुदेवांचे सान्निध्य मला अनुभवता आले. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी मला जाणीव करून दिली, ‘मी प्रत्येक नामासमवेत तुझ्या जवळच आहे.’ या जाणिवेने मन उचंबळून आले आणि मनाला शीतलता जाणवली.
३. नामजप करायला बसल्यावर गुरुचरणांच्या सेवेची दृश्ये सूक्ष्म स्तरावर डोळ्यांसमोर दाखवून गुरुदेवांनी मनातील इच्छा पूर्ण करणे
काही दिवसांनी मी ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत होतो. हे उपाय करतांना गुरुदेवांच्या कृपेमुळे मन आपोआप गुरुचरणांवर केंद्रित झाले आणि सूक्ष्म स्तरावर परात्पर गुरुदेवांच्या खोलीत पोचलो. त्या वेळी गुरुदेव पलंगावर पहुडलेले होते. त्या वेळी मला गुरुदेवांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळाली. ‘गुरुदेव माझ्याकडून उपायांच्या स्तरावर नामजप करून घेत असतांना दुसरीकडे मात्र पाय चेपून घेण्याची सेवाही करून घेत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. मला त्यांचे सान्निध्य जाणवू लागले. ‘माझी इच्छा देव कशी पूर्ण करत आहे ! एका बाजूला नामासहीत सेवा करून घेत आहे, तर दुसरीकडे गुरुसेवा देऊन माझ्या मनातील स्थूल सेवेची असणारी उणीव भरून काढत आहे’, याची मला जाणीव झाली.
४. नामजप करण्यासाठी डोळे मिटल्यावर गुरुसेवा करत असल्याचे दृश्य दिसणे आणि मनातील सेवेची आस देव भरून काढत असल्याच्या जाणिवेने मन कृतज्ञतेने भरून येणे
मी नामजप करायला बसायचो. त्यानंतर डोळे मिटल्यावर आपोआप गुरुदेवांच्या चरणांची सेवा करत असल्याचे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहून माझा भाव जागृत व्हायचा. त्या वेळी नामजपही आतून चालू झाला असल्याची जाणीव मनाला व्हायची. ‘देवाने मला स्थुलातून गुरुसेवेची संधी दिली नाही, तरी सूक्ष्म स्तरावर मनात निर्माण झालेली आस भगवंत कशी पूर्ण करत आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘नारायणस्वरूप गुरुदेव प्रत्येक साधकाची इच्छा कशी पूर्ण करतात !’, याची जाणीव होऊन मन कृतज्ञतेने भरून आले.
– श्रीविष्णुचरणार्पणमस्तु,
श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, गोवा. (१०.६.२०२१)
|