साधनेचा प्रदीर्घ अनुभव असूनही विनम्रभावात रहाणारे श्री. अरविंद ठक्कर (वय ६३ वर्षे) !
‘उद्या निज श्रावण कृष्ण चतुर्थी (३.९.२०२३) या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे साधक श्री. अरविंद ठक्कर यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. अरविंद ठक्कर यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नम्रता आणि प्रेमभाव !
१ अ. श्री. अरविंद ठक्कर यांच्यातील नम्रता आणि प्रेमभाव यांमुळे त्यांच्याशी लगेच जवळीक होणे : ‘साधारणतः वर्ष २००० मध्ये माझ्या आश्रम जीवनाला आरंभ झाला. त्या काळात मी ठाणे येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात सेवेसाठी होतो. तेव्हा मला अनेक ज्येष्ठ साधकांविषयी ऐकायला मिळायचे. त्यातील एक नाव होते, श्री. अरविंद ठक्कर यांचे. त्यांना सर्वजण प्रेमाने ‘अरविंदभैय्या’ म्हणून संबोधतात. तेव्हा अरविंदभैय्या म्हणजे करारी, शिस्तबद्ध, नियोजनकुशल, उत्तम नेतृत्व असणारे, असे त्यांच्याविषयी ऐकल्याने माझ्या मनात त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती होती; परंतु त्यांच्या संपर्कात आल्यावर मला त्यांचा एक महत्त्वाचा पैलू शिकायला मिळाला, तो म्हणजे त्यांच्यातील नम्रता ! त्यांच्यातील नम्रता आणि प्रेमभाव यांमुळे माझी त्यांच्याशी लगेचच जवळीक झाली.
१ आ. सर्वार्थाने मोठे असूनही साधकांशी नम्रतेने आणि आदराने बोलणे : अरविंदभैय्या पूर्वायुष्यात एक प्रथितयश व्यावसायिक होते. त्यांचे शिक्षण, सांपत्तिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, वय, अनुभव, साधना अशा सर्वच क्षेत्रांत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. असे असूनही ते माझ्याशी इतक्या आदराने आणि नम्रतेने बोलतात की, मला स्वतःलाच इतरांबरोबर मी करत असलेल्या माझ्या वर्तनाची लाज वाटू लागते. एक दिवस मी त्यांच्या मडगाव, गोवा येथील घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडील जेवणे आवरलेली असतांनाही ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) आशादीदी यांनी पुन्हा स्वयंपाक बनवून मला जेवायला वाढले. त्या वेळी त्यांच्या मुखावरील विनम्रभाव पहाण्यासारखा होता.
१ इ. अरविंदभैय्यांतील नम्रतेमुळे अल्प कालावधीतच समोरची व्यक्ती प्रभावित होणे : एकदा माझी भाची (वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर) काही कामानिमित्त आशादीदींना भेटायला गेली होती. नंतर तिला मडगाव रेल्वेस्थानकावर सोडायला अरविंदभैय्या गेले होते. तेव्हा इतक्या अल्प कालावधीतही ती भैय्यांमधील नम्रतेमुळे प्रभावित झाली.
२. सत्संगात उलट उत्तर किंवा स्पष्टीकरण न देणे आणि प्रत्येक सूत्र समजून घेणे
मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर काही काळ ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत साधकांकडून होणार्या चुकांविषयी सत्संग घ्यायचो. अरविंदभैय्या इंग्रजी ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाची सेवा पहात असल्याने त्यांच्याशी एक-दोन सत्संगात बोलणे झाले. त्या वेळी लक्षात आलेला भैय्या यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी सत्संगात उलट उत्तर कधीही दिले नाही किंवा चुकीचे स्पष्टीकरणही दिले नाही. ते प्रत्येक सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. त्या वेळी त्यांच्या मनाचा संघर्ष होत नव्हता, असे नाही; परंतु ते शांत राहून ‘काय चुकले’ ते अभ्यासण्याचा प्रयत्न करायचे. वास्तविक प्रत्येक चुकीशी त्यांचा थेट संबंध नसायचा; परंतु त्यांच्याकडे सेवेचे दायित्व असल्याने ते प्रत्येक चुकीचा साकल्याने अभ्यास करायचे. कदाचित् भैय्यांच्या याच गुणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले एक दिवस मला म्हणाले, ‘‘जलतारे, आपण अरविंद यांच्या चुका सांगतो, ते ठीक आहे; परंतु त्यांच्यामुळेच आपले इंग्रजी पाक्षिक चालू आहे हो !’’
३. इतरांमधील न्यूनत्व त्यांना जाणवू न देणे
काही वेळा इंग्रजी भाषेशी संबंधित एखादी सेवा करतांना इंग्रजी भाषेतील शंका विचारण्याच्या संदर्भात माझा भैय्यांशी संपर्क येतो. माझे इंग्रजीचे ज्ञान जेमतेमच असल्याने मी भैय्यांना बर्याचदा अगदी बालीश प्रश्न विचारतो. त्या वेळी त्यांचा ‘हा काय बालीश प्रश्न विचारतो ?’, असा आविर्भाव नसतो. ते मला मोठेपणा देऊन म्हणतात, ‘‘तुम्हाला तर सर्व ठाऊकच आहे; परंतु तुम्ही अमुक एक पर्याय वापरू शकता.’’ तो पर्याय ऐकल्यावर मला माझी चूक लक्षात येते; परंतु भैय्यांचे वैशिष्ट्य, म्हणजे ते ‘तुम्हाला इतकेही समजत नाही का ?’, अशी प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना इंग्रजीचे चांगले ज्ञान असूनही ते इतरांना स्वतःतील मोठेपणा किंवा इतरांचे न्यूनत्व जाणवू देत नाहीत.
४. एखाद्या गोष्टीसाठी अरविंदभैय्यांची प्रशंसा केल्यास त्यांनी त्याचे कर्तेपण गुरु आणि साधक यांना देणे
बर्याच वेळा भैय्यांकडून काही शिकायला मिळाल्यास किंवा त्यांच्याविषयी काही जाणवल्यास मी त्यांना तसे कळवतो. तेव्हा ते त्या गोष्टीचे कर्तेपण घेत नाहीत. ते त्याच क्षणी गुरुमहती सांगणारे सूत्र विशद करतात किंवा मला म्हणतात, ‘‘तुमचे माझ्यावर पुष्कळ प्रेम आहे. तुम्ही आनंद वाटत आहात.’’
श्री. अरविंदभैय्यांमधील हे गुण शिकण्याची दृष्टी दिली, यासाठी मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे. असेच गुण आमच्यातही यावेत, अशी प्रार्थना !’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)