परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !
सद्गुरु स्वाती खाडये यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेला पू. दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास !
१.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांनी रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात केलेली भावपूर्ण सेवा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करतांना त्यांनी पू. (कु.) दीपाली यांना कसे घडवले ?’, ही सूत्रे पाहिली. आजच्या भागात आपण ‘पू. दीपाली व्यष्टी भावाकडून समष्टी भावाकडे कशा वळल्या ? अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, ही सूत्रे पहाणार आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/716213.html
४. ‘गोपीभावा’तून, म्हणजे व्यष्टी भावातून समष्टी भावाकडे वळणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्यात गोपीभाव असतांना तुम्ही समष्टी सेवेकडे कशा काय वळलात ? तुम्हाला हे कसे काय जमले ? कारण गोपीभावातून, म्हणजे व्यष्टी भावातून समष्टी भावात जाणे कठीण असते.
कु. दीपाली मतकर : आधी मला ‘माझ्यामध्ये ‘गोपीभाव’ आहे’, हे कळत नसे; पण मी नेहमी भगवंताशी बोलत असे. त्याच्याशी बोलतच मी सगळ्या सेवा करत असे. गुरुदेवांनी ‘हा गोपीभाव आहे’, असे सांगितल्यावर ‘माझ्यात ‘गोपीभाव’ आहे’, हे मला कळले. मला ‘मी काही करत आहे’, असे कधी जाणवायचेच नाही, तर ‘देवच सर्व करत आहे’, असेच वाटायचे.
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अध्यात्मप्रसाराच्या सेवेतूनच कृष्ण भेटेल’, असे सांगितल्यावर प्रसाराच्या सेवेला जाण्यासाठी मनाची सिद्धता होणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही समष्टी सेवा करायला कधीपासून आरंभ केला ?
कु. दीपाली मतकर : मी पूर्वी गुरुदेवांची सेवा करत होते. तेव्हा ते मला सांगायचे, ‘‘हा तुझा ‘व्यष्टी भाव’ झाला. आता तू ‘समष्टी भावा’कडेे जायला हवे. त्यासाठी तू समष्टी सेवा, म्हणजे अध्यात्मप्रसाराची सेवा करायला हवी.’’ तेव्हा मी म्हणायचे, ‘‘तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही.’’ तेव्हा परम पूज्य मला म्हणायचे, ‘‘आता इथली (आश्रमातील) सेवा तू शिकली आहेस. आता तुला प्रसारात जायचे आहे.’’ त्या वेळी माझ्या मनाची सिद्धता नसायची. पुष्कळ वेळा गुरुदेवांनी मला ‘तुला समष्टी सेवेसाठी जायला हवे’, असे सांगितले; पण आश्रम सोडून जायची माझ्या मनाची सिद्धताच होत नव्हती. मग एकदा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुला कृष्ण हवा आहे ना ?’’ मी म्हणाले, ‘‘हो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘कृष्ण हवा आहे, तर तुला प्रसाराची सेवा करावी लागेल.’’
सद्गुरु स्वाती खाडये : गुरुदेवांना तुम्हाला एकाच सेवेत ठेवायचे नव्हते. ‘त्यांना तुम्हाला परिपूर्ण करायचे होते’, हे यातून शिकायला मिळाले. गुरुदेवांचे किती लक्ष असते आपल्या भक्ताकडे !
कु. दीपाली मतकर : गुरुदेवांंनी मला सांगितले, ‘‘श्रीकृष्ण प्रत्येकाच्या रूपात आहे आणि त्याला तुला अनुभवायचे असेल, तर तुला प्रसाराची सेवा करावी लागेल. प्रसाराच्या सेवेतूनच तुला भगवंत भेटेल.’’ त्यानंतर ‘गुरुदेवांनी सांगितले आहे, तर प्रसाराची सेवा शिकून घ्यायला हवी’, अशी माझ्या मनाची सिद्धता झाली आणि प्रसाराच्या सेवेला आरंभ झाला.
४ आ. सेवा शिकण्यासाठी सनातनच्या विविध आश्रमांत जाणे आणि त्यानंतर अध्यात्मप्रसाराची सेवा करण्याची संधी मिळणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही रामनाथी आश्रमात किती वर्षे राहिलात आणि अध्यात्मप्रसारासाठी तिथून कधी बाहेर पडलात ? तुम्ही कोणत्या सेवा केल्या ?
कु. दीपाली मतकर : मी वर्ष २००९ ते वर्ष २०१२ या कालावधीत रामनाथी आश्रमात होते. रामनाथी आश्रमात असतांना मी काही दिवस स्वयंपाकघरात सेवा केली. नंतर काही दिवस गुरुदेवांची सेवा आणि त्यानंतर काही दिवस ग्रंथांशी संबंधित सेवा केली. रामनाथी आश्रमात असतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडूनही शिकण्याची संधी मिळाली. वर्ष २०१२ मध्ये मी सेवेसाठी मिरज आश्रमात गेले. त्यानंतर काही दिवस मी कुडाळ सेवाकेंद्रात सेवा केली. नंतर मला रत्नागिरी सेवाकेंद्रात सेवेला जायची संधी मिळाली. तिथे गुरुपौर्णिमेच्या सेवा होत्या. त्यानंतर मला रत्नागिरी जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्याची संधी मिळाली. तेव्हा मला ‘अध्यात्मप्रसार म्हणजे काय करायचे ?’, हे ठाऊक नव्हते; पण ‘आपण ते शिकूया’, असे मला वाटायचे.
४ इ. सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांच्याकडून अध्यात्मप्रसाराची सेवा शिकणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्याचे प्रयत्न कसे केले ?
कु. दीपाली मतकर : मला अध्यात्मप्रसाराच्या सेवेचा काहीच अनुभव नव्हता. सद्गुरु स्वातीताई, तुम्ही जिल्ह्यात यायचा, तेव्हा ‘तुम्ही साधकांशी कशा बोलता ? सेवेचे नियोजन कसे करता ? साधकांना आधार कसा देता किंवा कसे साहाय्य करता ?’, हे शिकण्याचा प्रयत्न मी केला. ‘अध्यात्मप्रसाराची सेवा म्हणजे काय ? सत्संग कसे घ्यायचे ? हिंदु राष्ट्र जागृती सभा कशी असते ?’, हे सर्व मला तुमच्याकडून शिकता आले. माझी तशी प्रकृती नाही. केवळ ‘मी आणि माझी सेवा किंवा देवाशी बोलणे’, एवढेच माझे होते; पण तुम्ही ‘सगळ्यांना आनंद कसा मिळेल ? सगळ्यांना आधार कसा वाटेल ?’, असे वागायचात. ते मला तुमच्याकडून शिकता आले.
मी जिल्ह्यातील काही साधकांच्या समवेत सेवेला जायचे. तेव्हा ‘गुरुपौर्णिमा किंवा इतर सेवा यांचे नियोजन कसे केले जाते ?’, हे मला त्या साधकांकडून शिकता आले.
सद्गुरु स्वाती खाडये : हे छान आहे. तुमच्यात शिकण्याची वृत्ती होती; म्हणून देवाने तुम्हाला प्रसाराची सेवा करायला लवकर पाठवले आणि सगळ्या सेवा लवकर शिकवल्या. प.पू. गुरुदेवांनी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुम्हाला घडवले.
४ ई. ‘शिकण्याची वृत्ती आणि अल्प अहं यांमुळे कु. दीपाली अध्यात्मप्रसाराची सेवा लवकर शिकल्या’, असे सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगणे
सद्गुरु स्वाती खाडये : तुमची शिकण्याची वृत्ती असल्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा ताण आला नाही. आता प्रसाराच्या सेवेत एखाद्या साधकाला एखादी सेवा सांगितल्यावर तो पटकन ‘नाही’ म्हणतो. ‘सेवा कशी पूर्ण करणार ? माझ्याकडून ही सेवा होईल का ? मला जमेल का ?’, असे ताणाचे विचार त्याच्या मनात असतात; पण तुम्ही लहान असूनही हे सगळे लीलया जमवले. खरेतर साधनेमध्ये ‘मला काही येत नाही’, असाच विचार हवा. ‘मला काही येत नाही; पण देव मला घडवणार’, असा तुमचा भाव होता आणि ‘मला भगवंत पाहिजे’, हा एकच ध्यास होता. ‘मला कसे जमेल ?’ किंवा ‘मला जमणार नाही’, असे विचारच तुमच्या मनात नव्हते; कारण तुमच्यात तो अहंकारच नव्हता आणि अहंकार नसल्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी पटापट शिकत गेला. ‘शिकण्याची वृत्ती कशी असायला पाहिजे ?’, हे आपल्याला दीपालीताईंकडून शिकता येते.
५. कु. दीपाली यांना परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !
सद्गुरु स्वाती खाडये : सेवा करतांना तुम्हाला कधी देवाचे दर्शन झाले का ? कधी तुमचा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला का ? ‘कुणाला देवाचे दर्शन होते, कुणाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येतात किंवा कुणाला नाद ऐकू येतो ?’, असे कधी काही झाले का ?
कु. दीपाली मतकर : मला देवाचे दर्शन कधी झाले नाही; पण जेव्हा मी गुरुदेवांना प्रथम पाहिले, तेव्हा मला ‘भगवंत असाच असणार’, असे जाणवले. त्यांच्याकडे पहातांना ‘त्यांच्या देहातून सूर्यासारखा प्रकाश बाहेर पडत असून त्यांच्या वाणीतून चैतन्य पसरत आहे’, असे मला नेहमी जाणवायचे. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना बर्याच वेळा ‘श्रीकृष्ण मला काहीतरी सांगत आहे’, असा नाद ऐकू यायचा.
६. आध्यात्मिक मैत्रीणींशी मनमोकळेपणाने बोलणे आणि ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच साहाय्य करतात’, अशी अनुभूती येणे
सद्गुरु स्वाती खाडये : दीपालीताई, तुम्हाला कुणी ‘आध्यात्मिक मैत्रीण’ आहे का ? आपल्याला एक आध्यात्मिक मैत्रीण असली पाहिजे. तिच्या समोर आपण साधना किंवा सेवा यांविषयी आपल्या मनात जेे असेल, ते मनमोकळेपणाने बोलू शकतो. ती एखादी साधिका असेल किंवा संतही असतील कि तुम्ही कृष्णालाच आध्यात्मिक मित्र मानता ?
कु. दीपाली मतकर : रामनाथी आश्रमात असतांना माझे गोपीभाव असलेल्या तृप्तीताईंशी (कु. तृप्ती गावडे यांच्याशी) बोलणे व्हायचे; पण मी प्रसाराच्या सेवेसाठी आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आमचे बोलणे होत नसे. नंतर मी प्रसारातील साधकांशी बोलायचेे आणि मनातून परम पूज्यांशी बोलायचे. मी तुमच्याशी (सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी) मनमोकळेपणाने बोलत होते. माझ्याकडून एखादी सेवा करायची राहिली, तर त्याविषयी मी तुम्हालाच सांगत असे. कधी कधी मी मनीषाताईंशीही (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याशीही) बोलत असेे. जठारकाकू (सौ. उल्का जठार (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)) या माझी आध्यात्मिक मैत्रीण ! जठारकाकूंशी मी मनमोकळेपणे बोलते. देवाने त्यांच्या रूपात मला आईच दिली आहे. त्या आणि साखरेकाकू (श्रीमती वीणा साखरे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), या दोघींशी मी मनमोकळेपणे बोलते. त्यांच्या माध्यमातून गुरुदेव मला दिशा देतात आणि साहाय्यही करतात.
७. प्रसाराची सेवा करतांना होणारे त्रास नामजपादी उपाय आणि भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर नाहीसे होणे
सद्गुरु स्वाती खाडये : प्रसाराची सेवा करतांना तुम्हाला कधी अनिष्ट शक्तींचा त्रास झाला का ?
कु. दीपाली मतकर : प्रसाराच्या कालावधीत मला ‘थकवा येणे किंवा न सुचणे’, असे त्रास व्हायचे; पण नामजपादी उपाय किंवा भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर ते त्रास नाहीसे व्हायचे.’
(२१.४.२०२३)
(क्रमशः)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |