यमदेवाचा अवमान टाळा !
सामाजिक संकेतस्थळावर मध्यंतरी एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘यमलोकात जातांना तुमच्या आवडीच्या ३ वस्तू नेण्याची संधी यमराजाने तुम्हाला दिली, तर तुम्ही काय न्याल ?’ यावर अनेक हिंदूंनी विविध प्रकारे उत्तर दिले होते. ‘बायको, पुस्तक, शेती, भ्रमणभाष, चार्जर, पॉवर बँक, वायफाय यंत्रणा, जपमाळ, पोथी’, असे विविध पर्याय काहींनी दिले, तर काहींनी ‘जगातील दुःख, वेदना आणि पापवृत्ती आम्ही तेथे नेऊ, तेवढेच या जगातील त्यांचे प्रमाण न्यून होईल’, असे म्हटले. काहींनी तर खाण्याच्या पदार्थांची नावे घेतली. सर्वांनी दिलेली उत्तरे वाचून त्यांनी ‘यमलोक’ या ठिकाणाचा वापर मनोरंजनासाठी केल्याचे लक्षात आले.
यमलोक म्हणजे काय मौजमजेचे ठिकाण आहे का की, जेथे आपण काहीही नेऊ शकतो. यमलोक, त्याचे स्थान, तेथे कोण जाते, तसेच यमदेवता, तिचे कार्य यांविषयी हिंदूंना यत्किंचितही ठाऊक नाही. मृत्यूनंतर कुणालाही आपल्या समवेत काहीही नेता येत नाही. असे असतांना अशा स्वरूपाचा प्रश्न विचारून ‘हिंदु धर्म आणि यमदेव यांची खिल्ली उडवण्याचाच प्रकार या माध्यमातून केला गेला’, हे उघड होते. हिंदूही याला हसून प्रत्युत्तर देतात. एकाही हिंदूने या लिखाणाला ‘असा प्रश्न विचारणे कसे अयोग्य आहे’, असे प्रत्युत्तर दिले नाही. याला कारण हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव ! ‘मृत्यूनंतर जिवाचे काय होते ?’, याची हिंदूंना कल्पनाच नाही. स्वर्ग आणि नरक याही संकल्पनांच्या पलीकडे काहीतरी आहे. मृत्यूनंतर संबंधित जिवाचा प्रवास सप्तलोक (भू, भुव, स्वर्ग, महा, जन, तप, सत्य) किंवा सप्तपाताळ अशा दिशेने होत असतो. कोणत्या लोकांत किंवा पाताळात कोणते जीव जातात ? याविषयी किती हिंदूंना ठाऊक आहे ? जरी ठाऊक असले, तरी किती हिंदू योग्य मार्गाने आचरण करतात ? आपण मनुष्यरूपात असतांना आपल्याकडून वाईट कर्मे किंवा चुका झाल्यास त्यांची नोंद चित्रगुप्त ठेवतो. आपल्या मृत्यूनंतर तो हे सर्व यमाला देतो. त्यानुसार यम योग्य न्यायनिवाडा करून शिक्षा देतो. जेथे जाऊन शिक्षा भोगायची आहे, तेथे वरील वस्तूंचा उपयोगच काय ? यमदेव म्हणजे मृत्यूची देवता आहे. त्यामुळे अशा देवतेच्या वास्तव्याच्या ठिकाणी भौतिक वस्तू नेताच येऊ शकत नाहीत. मृत्यूनंतरचा जिवाचा प्रवास योग्य व्हावा आणि त्या लिंगदेहाला गती मिळावी, यासाठी काय करायला हवे ? याविषयी हिंदूंमध्ये जागृती व्हायला हवी, हेच यातून लक्षात येते.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.