इंडिया आघाडीच्या समन्वयासाठी समितीची स्थापना !

बोधचिन्हाच्या (लोगोच्या) अनावरणाचा कार्यक्रम ऐनवेळी रहित !

राष्ट्रीय मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत चालू असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत १ सप्टेंबर या दिवशी समन्वयासाठी १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. यासह ‘इंडिया’ आघाडीच्या बोधचिन्हाचे (लोगोचे) अनावरण करण्याचा नियोजित कार्यक्रम मात्र आयत्या वेळी रहित करण्यात आला.

समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, तेजस्वी यादव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलीन, अभिषेक बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, के.सी. वेणुगोपाळ, मेहबूबा मुफ्ती, डी. राजा, ललन सिंग, राघव चढ्ढा आणि जावेद खान या नेत्यांचा समावेश आहे. आघाडीचे ‘जितेगा भारत, जितेगा इंडिया’, असे घोषवाक्य या वेळी निश्‍चित करण्यात आले. या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्रित सभा घेणे, एकत्रित रॅली काढणे, भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करणे आदी निर्णय घेण्यात आले.