‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’चे फलक दाखवून आमदार बच्चू कडू यांचे सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन !
कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याने ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन सोडण्याची मागणी
मुंबई – ‘आम्हाला जुगार खेळून लाखो रुपयांचे कर्ज करून घ्यायचे आहे. कृपया भीक द्या’, ‘लहान असो किंवा थोर जुगाराची सवय लावून घ्या आणि माझ्यासमवेत जुगार खेळा’, ‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’ अशा प्रकारचे फलक दाखवून ३१ ऑगस्ट या दिवशी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाच्या समोर आंदोलन केले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘सचिन तेंडुलकर यांनी ‘पेटीएम् फर्स्ट गेम्स्’ या ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन केले आहे. बच्चू कडू यांनी या प्रकरणी सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सचिन यांच्या ‘ऑनलाईन गेमिंग’च्या विज्ञापनाचा परिणाम जनमानसावर होत आहे. कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी हे विज्ञापन सोडावे. अन्यथा प्रत्येक गणेशोत्सव मंडळापुढे आम्ही दानपेटी ठेवणार आहोत. दानपेटीत जमा होणारा पैसा गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी आम्ही सचिन तेंडुलकर यांना देणार आहोत. सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी देण्यासाठी आम्ही गणपतीला प्रार्थनाही करणार आहोत’, असे प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले.
पैसे नसतील तर सांग, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो आणि तुला देतो, बच्चू कडू सचिनविरोधात आक्रमकhttps://t.co/e06AcyVjGV#BacchuKadu #SachinTendulkar
— Maharashtra Times (@mataonline) August 31, 2023
याविषयी सचिन तेंडुलकर काही बोलतील का ?
विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न परत करावा !
सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला नसता, तर आम्ही काही बोललो नसतो. पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न तरी परत करावा, असे आवाहन या वेळी बच्चू कडू यांनी केले. |