मानवी मनोरे रचतांना दुर्घटनाग्रस्त होणार्या ७५ सहस्र गोविंदांना विमा संरक्षण ! – संजय बनसोडे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
मुंबई – दहीहंडी उत्सव आणि ‘प्रो-गोविंदा लीग’ स्पर्धेत मानवी मनोरे रचतांना होणार्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ सहस्र गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याविषयीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, असे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, दहीहंडी उत्सव, प्रो-गोविंदा लीगमधील सहभागी मानवी मनोरे रचतांना अपघात होऊन गोविंदांचा मृत्यू होण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी शासन निर्णय १८ ऑगस्ट २०२३ नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या ५० सहस्र गोविदांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त २५ सहस्र गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनी’ला प्रतिगोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण १८ लाख ७५ सहस्र रुपये निधी देण्यासाठी ‘दहीहंडी समन्वय समिती’स वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.