आंंबिवली (पालघर) येथील इराणी वस्तीत चोरट्याला पकडणार्‍या पोलिसांवर दगडफेक !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – कल्याणजवळील आंबिवली भागातील इराणी वस्तीत फिरोज खान (वय ६२ वर्षे) या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी मुंबईच्या डी.एन्.नगर पोलीस ठाण्याचे पोलीस गेले होते. त्या वेळी आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. पोलीस आणि आरोपीचे नातेवाईक यांच्यात झटापट झाली. शेवटी पोलिसांनी फिरोज खान याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. फिरोज याच्या विरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ३५ गुन्हे नोंद आहेत.

फिरोज याने एका व्यक्तीची १ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अंधेरी येथे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अन्वेषणात फिरोज हा अनेक गुन्हे करून पसार झाला असल्याचे समजले. तो आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांचे एक पथक वस्तीच्या आसपास दबा धरून बसले होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतांनाच वरील प्रकार घडला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. फिरोज याला अटक करून मुंबईला नेण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच पोलिसांवर दगड फेकण्यापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मजल जाते, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे !
  • आणखी किती आक्रमणे झाल्यावर पोलीस स्वतःचा धाक किंवा दरारा निर्माण करणार आहेत ?