‘पाटये पुनर्वसन’ येथे दोघांना अमली पदार्थ सेवन करतांना अटक
दोडामार्ग – तालुक्यातील ‘पाटये पुनर्वसन’ येथे २ युवकांना अमली पदार्थांचे सेवन करतांना पोलिसांनी पकडले. यामुळे तालुक्यात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.
पाटये पुनर्वसन येथील कालव्यावर अमित मधुकर गवस (वय २८ वर्षे, पाटये पुनर्वसन) आणि संदेश ब्रह्मदेव नाईक (वय ३३ वर्षे, नाईकवाडी, परमे) या दोघांना २८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी विलंबाने पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या वेळी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून २९ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित केले. या वेळी न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ, तसेच मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री होत आहे. अमली पदार्थांपासून भावी पिढी वाचावी, यासाठी अधूनमधून काही राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संस्था अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईची मागणी पोलिसांकडे करत असतात. या प्रकारांवर वेळीच आळा न घातल्यास भावी पिढीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.