सुळकूडमधील दूधगंगा नदीमधून इचलकरंजीला पाणी देण्यात येऊ नये ! – दूधगंगा बचाव कृती समिती
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर ) – इचलकरंजी शहरास सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे स्रोत, पाण्याची आवश्यकता याचे सर्वेक्षण करावे. इचलकरंजी शहरास पाणी अल्प पडत असेल, तर ते कृष्णा किंवा वारणा नदीतून उपलब्ध होऊ शकते. पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी कोल्हापूर महापालिकेने सविस्तर अहवाल शासनास सादर करावा. सुळकूडमधील दूधगंगा नदीमधून इचलकरंजीला पाणी देण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन ‘दूधगंगा बचाव कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांसह अन्य उपस्थित होते.
काळम्मावाडी धरणाच्या गळतीला तातडीने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, सुळकूड पाणी योजनेस दूधगंगा काठावरील राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ, चिक्कोडी, निपाणी येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचा तीव्र विरोध असल्याने ही यंोजना रहित करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या योजनेची माहिती घेऊन कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळास दिली.