सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाविषयी साधकांना आणि ‘सनातन प्रभात’विषयी हिंदु धर्माभिमानी यांना आलेल्या अनुभूती !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला गोव्याला जाण्याची संधी न मिळणे; मात्र त्या दिवशी अकस्मात् घरी कृष्णकमळाच्या वेलीला पुष्कळ फुले आल्यामुळे साधक दांपत्याला ‘गुरुदेवांनी फुलांच्या माध्यमातून घरीच दर्शन दिले आहे’, असे जाणवणे
‘११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ब्रह्मोत्सव होता. या सोहळ्याला विदर्भातील साधक आले नव्हते. वणी, जिल्हा यवतमाळ येथील एक साधक श्री. लहू खामणकर (वय ६६ वर्षे) यांनी गुरुदेवांची कृपा घरीच अनुभवली. ते म्हणाले, ‘‘आमच्या घरातील अंगणात कृष्णकमळाचा वेल आहे. त्या वेलावर १०.५.२०२३ या दिवशी एक फूल आले. आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसर्या दिवशी, म्हणजे ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मात्र अकस्मात् त्या वेलीवर कृष्णकमळाची पुष्कळ फुले फुलली. तेव्हा आमच्या (मी आणि माझी पत्नी सौ. कल्पना खामणकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे)) लक्षात आले की, ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ब्रह्मोत्सव गोवा येथे साजरा झाला. त्या महोत्सवात आम्हाला प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही, तरी गुरुमाऊलीने घरबसल्या कृष्णकमळाच्या फुलांच्या माध्यमातून दर्शन दिले. आम्ही ती सर्व फुले आमच्या घरी असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या छायाचित्राला अर्पण केली. तेव्हा आमचा भाव जागृत झाला.’
२. यवतमाळ येथील हिंदु धर्माभिमानी श्री. फाळके यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आलेल्या अनुभूती
२ अ. साधनेविषयी असलेल्या कोणत्याही शंकेचे निरसन दुसर्या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून होत असल्याची अनुभूती येणे : यवतमाळ येथे श्री. फाळके हे धर्माभिमानी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मी यवतमाळ येथे गेलो असता ते मला भेटायला आले होते. ते म्हणाले, ‘‘मी जेव्हापासून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक झालो, तेव्हापासून माझ्या घरात पुष्कळ शांतता जाणवते. आम्ही पती, पत्नी आणि मुलगी यांच्यातील वाद-विवाद न्यून झाले आहेत. आमच्या मनात साधनेविषयी काहीही शंका आली, तर दुसर्या दिवशीच्या दैनिकात त्या शंकेचे निरसन होणारा लेख किंवा चौकट प्रसिद्ध होते.
२ आ. नातेवाइकाने नागीण या आजारावरील औषधोपचार विचारल्यावर दुसर्या दिवशी दैनिकात त्यावरील सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची विविध विकारांवरील देवतांच्या नामजपाची चौकट प्रसिद्ध होणे आणि ती वाचल्यावर भावजागृती होणे : माझ्या एका नातेवाइकाने त्याला नागीण नावाचा विकार झाल्याचे मला कळवले आणि ‘काही औषध असेल, तर कळवा’, असे सांगितले. दुसर्या दिवशीच्या दैनिकात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची विविध विकारांवरील देवतांच्या नामजपाची चौकट प्रसिद्ध झाली होती आणि त्यात नागीण या विकारावर नामजप दिला होता. ते वाचून माझी भावजागृती झाली. तो जप मी माझ्या नातेवाइकांना कळवला.’
– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत, वय ७३ वर्षे), गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |