गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सातारा पोलीस दलाने सतर्कता बाळगावी ! – शंभूराज देसाई
सातारा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सतर्कता बाळगावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. येथील शिवतेज सभागृहामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी आतापासून बैठका घ्या. जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. सध्या सायबर म्हणजेच सामाजिक प्रसारमाध्यमांतून होणार्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ते अल्प करण्यासाठी आणि ‘सायबर सेल’ अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. ‘सायबर सेल’ हाताळण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. जिल्हा वार्षिक योजनेमधून सातारा पोलीस दलाला वाहने उपलब्ध करून दिली आहेत. आणखी आवश्यकता असल्यास त्याचाही प्रस्ताव सादर करावा. नवीन पोलीस ठाणे, पोलिसांसाठी निवासस्थान इमारती या बांधकामांचे प्रस्तावही द्यावेत. त्यानंतर हे प्रश्न मार्गी लावले जातील.