परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधनेची वाटचाल करतांना पू. शिवाजी वटकर यांना प्राप्त झालेले संतपद आणि त्यांना स्वतःत जाणवलेले पालट !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

३० ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्संग आणि त्यांनी पू. शिवाजी वटकर यांचे केलेले कौतुक’ यांविषयी पाहिले. आज या साधनाप्रवासातील अंतिम भाग पाहू.  

(भाग १५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/715552.html

पू. शिवाजी वटकर

३१. सेवा करत असतांना व्यष्टी साधनेचे गांभीर्य लक्षात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढणेे

वर्ष २००७ पासून साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करण्यासाठी विशेष शिबिरे घेऊन साधकांना व्यष्टी साधना (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन) करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरानंतर माझ्यात व्यष्टी साधनेचेे गांभीर्य वाढले. माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू मोठ्या प्रमाणात होते. या शिबिरांनंतर ‘माझा कार्याकडील ओढा वाढला असून व्यष्टी साधनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे’, याची मला जाणीव झाली. त्या दिवसापासून मी ठरवले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना केली पाहिजे.’ त्यानंतर सेवा करतांना माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने होऊ लागले.

३२. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होणे

३२ अ. वाढदिवसाच्या दिवशी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित होणे आणि त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवरून बोलण्याची संधी मिळून त्यांनी ‘मला पुष्कळ आनंद झाला’, असे सांगणे : ‘१३.१०.२००८ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित करून माझा सत्कार करण्यात आला. परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सनातनच्या पहिल्या ४० साधकांमध्ये माझे नाव आले. त्या दिवशी रात्री परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवरून बोलतांना ते मला म्हणाले, ‘‘मला पुष्कळ आनंद झाला आहे. तुम्हाला अनिष्ट शक्तींनी प्रगतीचे प्रमाणपत्रच दिले आहे.’’

(श्री. वटकर यांनी अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय केले. त्या वेळी अनेक साधकांचा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला होता. – संकलक)

३२ आ. जाणवलेला पालट : माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली. त्या वर्षी माझ्याकडे असलेल्या पांढर्‍या सदर्‍याचा रंग गुलाबी झाला होता.

३३. ६० टक्के आध्यात्मिक पातळी ते संतपद (७० टक्के आध्यात्मिक पातळी) प्राप्त होईपर्यंतची मनाची विचारप्रक्रिया !

३३ अ. संतपद गाठण्याविषयीचे विचार उणावणे आणि नंतर ते विचार न येणे : वर्ष २०१७ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली. त्यानंतर ‘आध्यात्मिक प्रगती होऊन संत व्हावे’, यांविषयीचे माझे विचार उणावत गेले. वर्ष २०१८ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असतांना माझ्या मनात थोडेफार प्रगतीविषयी विचार येत होते. त्यानंतर मात्र या विचारांचे प्रमाण न्यून होऊन ते बंद झाले.

३३ आ. इतरांविषयी असलेल्या अपेक्षा उणावून स्थिरता येणे : पूर्वी मला कुटुंबीय आणि सहसाधक यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. वर्ष २०१९ मध्ये ‘स्वतःविषयी, तसेच इतर लोक किंवा परिस्थिती यांच्याविषयी माझ्या मनात असलेल्या अपेक्षा न्यून झाल्या आहेत’, असे मला जाणवू लागले. पूर्वी चुका झाल्यावर मला ताण यायचा; परंतु नंतर चुकांतून शिकता येऊ लागले. त्यामुळे माझे मन स्थिर होऊ लागले. गुरुपौर्णिमा २०१९ पूर्वी माझ्या मनाची स्थिती स्थिर होती. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने चालू होते.

३३ इ. ‘वटकर यांना संत व्हायला अजून २ वर्षे लागतील’, असे सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुमच्या मृत्यूनंतरही मी तुमच्या समवेत असणार आहे’, असे सांगून आश्‍वस्त केल्याने आनंद होणे : वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या २ मास अगोदर माझे आध्यात्मिक मित्र श्री. तुकाराम लोंढे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गेले होते. तेव्हा त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्या प्रगतीविषयी विचारले, ‘‘वटकरकाका संत केव्हा होणार ?’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘त्यांची साधना चांगली चालू आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यांना संत होण्यास आणखी २ वर्षे लागतील !’’ तेव्हा श्री. लोंढे त्यांना म्हणाले, ‘‘वटकरकाकांचे आता वय झाले आहे. ते लवकर संत झाले, तर बरे होईल.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी नंतरही त्यांच्या समवेत असणार आहे.’’ साधनेच्या आरंभीच्या काळात मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सतत १० वर्षे स्थुलातून सत्संग मिळाला. ते एखाद्या दिवशी भेटले नाहीत, तर मला अस्वस्थता यायची. नंतर ते गोव्याला गेल्यावर मला त्यांचा सूक्ष्मातील सत्संग मिळू लागला; मात्र ‘माझ्या मृत्यूनंतर काय होईल ?’, असा प्रश्‍न मला पडायचा. ‘परात्पर गुरु डॉक्टर मृत्यूनंतरही माझ्या समवेत असणार आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. या घटनेनंतर मी स्थिर आणि सकारात्मक झालो.

३३ ई. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःला त्यांच्या चरणांजवळ ठेवले आहे’, या विचारांमुळे कृतज्ञताभावात रहाता येणे : माझ्या समवेत आणि माझ्यानंतर साधनेत आलेले साधक माझ्या आधी संत झाले. तेव्हा कधीतरी मला वाटायचे, ‘६० टक्के पातळी गाठून १० वर्षे झाल्यावरही मी संतपद गाठू शकत नाही’; मात्र ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या चरणांजवळ ठेवलेे आहे’, याविषयी मला कृतज्ञता वाटायची. ‘१४.१.१९९९ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तुम्ही संत होणार’, आशीर्वाद दिला आहे’, याची आठवण होऊन माझा कृतज्ञताभाव जागृत व्हायचा.

३४. प्रगती झाल्याविषयी (संतपद प्राप्त झाल्याविषयी) मिळालेले संकेत

३४ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘संत’ झाल्याविषयी दिलेला संकेत ! : मार्च २०१९ मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केला. त्या अगोदर ३ मास ते मला अधूनमधून सांगायचे, ‘‘तुमचे काम झालेे आहे. (म्हणजे तुमची प्रगती झाली आहे.)’’ तेव्हा ते मला ‘मी संतपद गाठले आहे’, असे सुचवत होते.

३४ आ. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे : मला साधनेत कधी अडचण आल्यास मी देवद, पनवेल येथील आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३३ वर्षे) यांच्याशी बोलतो. माझ्यासारख्या चांगदेवाला साधनेत मार्गदर्शन करणार्‍या त्या जणू मुक्ताईच आहेत. मी त्यांना म्हटले, ‘‘माझी प्रगती होण्यासाठी आणखी २ वर्षे लागतील’, असे मला कळले आहे. हे मला फार कठीण वाटत आहे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘काका, गुरुपौर्णिमेला आणखी एक मास, म्हणजे ३० दिवस आहेत. तुम्ही प्रयत्न करा.’’ त्यामुळे मला सकारात्मक राहून गांभीर्याने प्रयत्न करता आले.

३४ इ. देवद आश्रमातील काही साधक मला म्हणायचे, ‘‘काका, ‘तुम्ही संतपद गाठले आहे’, असे आम्हाला जाणवते.’’

३५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने संतपदी विराजमान होणे

३५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वादात्मक पत्राद्वारे केलेला गौरव ! : गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी (१६.७.२०१९ या दिवशी) ‘माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असून मी संतपदावर विराजमान झालो आहे’, असेे घोषित करण्यात आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या आशीर्वादात्मक पत्रात लिहिले, ‘श्री. शिवाजी वटकर यांच्या मनात अन्यायाविरुद्ध सात्त्विक चीड असून ‘देव आणि धर्म यांची विटंबना होऊ नये’, यासाठी ते अत्यंत जागरूक असतात. त्यांच्यातील समर्पणभाव आणि क्षात्रवृत्ती यांमुळे त्यांना धर्महानी रोखण्यात यशही मिळते. अशक्य वाटणार्‍या गोष्टीही त्यांनी सहजसाध्य करून दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘आदर्श धर्मरक्षक’ असे म्हणता येईल.’

३६. संतपद प्राप्त झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर जाणवलेले पालट

३६ अ. शारीरिक

३६ अ १. झोप न्यून होऊन उत्साह वाढणे : पूर्वी मी रात्री १० वाजता झोपून पहाटे ४ ते ५ या वेळेत गजर लावून उठत असे आणि दुपारी १ घंटा झोपत असे. आता रात्री १० वाजता झोपून मला पहाटे ३ च्या सुमारास आपोआप जाग येते आणि व्यायाम करणे, चालणे, मंत्रजप करणे, हे सर्व नेहमीप्रमाणेच होते. आता दुपारी १५ मिनिटे ते अर्धा घंटा विश्रांती घेतली, तरी मला ताजेतवाने वाटते.

३६ अ २. ऑगस्ट २०२० पासून माझे हात आणि पाय यांची नखे पिवळी पडत आहेत.

३६ आ. मानसिक पालट

३६ आ १. अपेक्षा आणि आसक्ती उणावणे : मार्च २०२० ते जून २०२० या ४ मासांच्या कालावधीत मला पाठीच्या मणक्यांचा पुष्कळ त्रास झाला. त्यामुळे मला सतत झोपून रहावे लागले. असे असूनही गुरुदेवांनी माझ्या मनाची स्थिती सकारात्मक आणि आनंदी ठेवली. या प्रसंगामुळे ‘स्वतःचे शरीर पूर्वीसारखेच सुदृढ राहिले पाहिजे’, याविषयीची माझी अपेक्षा किंवा माझी वेशभूषेविषयीची आसक्तीही देवाने अल्प केली.

३६ आ २. अलिप्तता न्यून होऊन आनंदी रहाण्याचे प्रमाण वाढणे : संत होण्यापूर्वी मी पुष्कळ अलिप्त राहून आणि कामापुरते ठराविक साधकांशी बोलत अन् मिसळत असे. आता मला ‘सर्व साधकांशी बोलावे, त्यांच्यात मिसळावे, साधनेविषयी एकमेकांशी बोलून त्यांना साहाय्य करावे आणि आनंदाने रहावेे’, असे वाटते.

३६ इ. आध्यात्मिक पालट

३६ इ १. ‘भगवंत चैतन्याच्या स्तरावर सर्वकाही करत आहे’, हे लक्षात येऊन साक्षीभावात आणि शिकण्याच्या स्थितीत रहाता येणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर मला हळूहळू वरच्या आध्यात्मिक टप्प्याला घेऊन जात आहेत’, याविषयी कृतज्ञता वाटून माझा आनंद वाढला आहे. आता मला माझ्या भोवतालचे वातावरण अधिक चैतन्यमय वाटते. ‘सर्व गोष्टी आपोआप आणि सुरळीत होत आहेत’, असे मला वाटते. स्थुलातून पुष्कळ धडपड करून कार्य करत रहाण्यापेक्षा आवश्यक ती कृती करून ‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होते ? भगवंतच सर्वकाही कसे करत आहे ? मला साक्षीभावात रहाता येते का ? मला शिकण्याच्या स्थितीत रहाता येते का ?’, याचे चिंतन होऊ लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आनंद वाढला आहे.

३६ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्‍वर असून ते चैतन्यरूपात सर्वत्र आहेत’, असे जाणवून त्यांचे चैतन्य अनुभवता येणे : पूर्वी ‘मला सेवा म्हणजेच सर्वकाही आहे’, असे वाटायचे. साधना म्हणून मला भावजागृतीचे प्रयत्न प्रयत्नपूर्वक करावे लागायचे. आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने हळूहळू मला सर्व सजीव आणि निर्जीव अशा सर्व गोष्टींमध्ये ईश्‍वरी तत्त्व अनुभवता येत आहे. माझा गुरुदेवांप्रती असलेला भाव सगुणाकडून निर्गुणाकडे जात असल्याने मला त्यांना व्यापक स्तरावर अनुभवता येत आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे ईश्‍वर आहेत आणि ते चैतन्यरूपात सर्वत्र आहेत’, असे जाणवून मला त्यांचे चैतन्य सर्वत्र अनुभवता येऊन आनंद मिळत आहे.

३६ इ ३. ‘सर्वकाही ईश्‍वरेच्छेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या इच्छेने घडत असून ‘ते आपल्या भल्यासाठीच घडत आहे’, याची जाणीव वाढणे : आता ‘कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, साधनेला विरोध झाला, वयोमानानुसार आजारपण आले किंवा काहीही झाले, तरी ते ईश्‍वरेच्छेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या इच्छेने होत असून ‘ते माझ्या भल्यासाठीच होत आहे’, अशी माझी श्रद्धा वाढली आहे. ते प्रत्येक प्रसंगातून मला शिकवत आहेत. मी स्थिर आणि शांत राहून सूक्ष्मातून गुरुचरणांजवळ बसून आनंद लुटत रहावा’, असे मला वाटते.

संतपद प्राप्त होणे आणि हे सर्व पालट होणे, यांसाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने हे सर्व होत आहे’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२०)


प्रांजळपणा, गुरुनिष्ठा, धर्मकार्याची तीव्र तळमळ आणि प्रसंगी क्षात्रवृत्ती यांचे दर्शन घडवणारा पू. शिवाजी वटकरकाका यांचा प्रेरणादायी साधनाप्रवास !

सौ. सुजाता कुलकर्णी

‘धन्य ते परात्पर गुरु डॉक्टर आणि धन्य ते त्यांनी घडवलेले संतरत्न पू. शिवाजी वटकर ! पू. वटकरकाका यांनी लिहिलेला त्यांचा साधनाप्रवास इतका अप्रतिम आहे की, तो वाचतांना ‘मीही सर्व घटना अनुभवत आहे’, असे मला वाटत होते आणि मी पुष्कळ चैतन्य अन् आनंद अनुभवत होते. त्यांचा साधनाप्रवास हा जणू सनातनचा इतिहासच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्याविषयी त्यांनी केलेल्या लिखाणातून त्यांच्यातील भाव, भक्ती, आज्ञापालन, तत्त्वनिष्ठता आदी अनेक गुणांचे दर्शन होते.

या लिखाणातून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळतात. त्यांनी प्रत्येक प्रसंगाची नोंद ठेवली असून सर्व लिखाण परिपूर्णतेने केले आहे. त्यांच्या लिखाणातून प्रांजळपणा, गुरुनिष्ठा आणि प्रसंगी क्षात्रतेज यांचे दर्शन होते. त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा सुरेख समतोल साधला आहे. ‘धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेला परात्पर गुरुदेवांचा एक साधकही किती मोठ्या प्रमाणावर समष्टी लढा देऊन तो यशस्वी करू शकतो’, हे लिखाण वाचतांना लक्षात येते.

ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गावरील एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास मला वाचायला दिला, त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. शिवाजी वटकरकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता मधुसूदन कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१४.२.२०२३)