कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय ८ वर्षांपासून पुरस्काराच्या निधीपासून वंचित !

सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेचा परिणाम !

-श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई – संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धन यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून  दिल्या जाणार्‍या ‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’ची स्थिती अतिशय दयनीय आहे. ‘कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाला वर्ष २०१५ पासून या पुरस्काराचा निधी सरकारकडून मिळालेला नाही’, अशी धक्कादायक माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.

त्यामुळे मागील ८ वर्षांपासून राज्यात एकमात्र असलेल्या कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाला पुरस्काराच्या रकमेसाठी सरकारपुढे हात पसरावे लागत आहेत. वर्ष २०२१ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रामटेक (नागपूर) येथील कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयात वर्ष २०१५ ते २०२० या ६ वर्षांचे पुरस्कार एकत्रित देण्यात आले.

रामटेक (नागपूर) येथील कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय

या वेळी पुरस्कारासाठी आणि कार्यक्रमासाठी एकूण १८ लाख रुपये इतका व्यय आला. ‘ही रक्कम विश्‍वविद्यालयाने खर्च करून ती मिळण्यासाठीची पुढील प्रक्रिया करण्याविषयी सरकारकडे पाठवावी’, असे या वेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. त्यानंतर हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मंत्रीमहोदयांनी संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराविषयी भाषणही केले; मात्र पुरस्काराची रक्कम अद्यापही विश्‍वविद्यालयाला प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्‍या खर्चाचे काय ?’, असे प्रश्‍न कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत. सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे देवभाषा असलेल्या संस्कृत भाषेच्या पुरस्काराची महाराष्ट्रासारख्या संतभूमीत फरफट चालू आहे.

संतभूमी महाराष्ट्रात संस्कृतच्या पुरस्काराची फरफट !

१. १० वर्षांत पुरस्काराच्या रकमेत १ रुपयाचीही वाढ नाही !
२. पुरस्कार एकदाही ‘संस्कृतदिनी’ दिला गेलेला नाही !
३. ५-६ वर्षांचे पुरस्कार एकत्र देऊन पार पाडला जातो पुरस्काराचा सोपस्कार !