गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !
पुणे – येथील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथे राज्यातील अनेक जिल्ह्यांतून नागरिक येतात. त्यामुळे या कालावधीत पुण्यातील विविध भागांत मोठी गर्दी असते. जुलैमध्ये पुणे पोलिसांनी कोथरूड भागात २ आतंकवादी पकडले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या काळात नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही सुरक्षाव्यवस्थेची काळजी घेण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार स्वतः शहरातील गणेशोत्सव मंडळांसह संरक्षणाच्या संदर्भात आढावा बैठका घेत आहेत. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. काही दिवसांतच गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित करण्यात येणार आहे. त्या वेळी गणेशोत्सव मंडळांनाही सूचना देण्यात येणार आहेत.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |