प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, हस्तकला महामंडळ

हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी

प्रवीण आर्लेकर

पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आहे. अशा मूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच चिकणमातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांना गोवा हस्तकला महामंडळाचे अनुदान दिले जाणार नाही, अशी चेतावणी गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे.

चिकणमातीपासून मूर्ती बनवणार्‍यांना गोवा हस्तकला महामंहळ प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान प्रतिवर्ष देत असते. आमदार प्रवीण आर्लेकर पुढे म्हणाले, ‘‘विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, तर चिकण मातीपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यात विरघळतात. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा अजूनही अबाधित ठेवली आहे. ही परंपरा आजच्या मूर्तीकारांनी पुढील पिढीपर्यंत न्यायची आहे. मूर्तीकारांनी अधिकाधिक श्री गणेशमूर्ती चिकणमातीच्या बनवाव्यात यासाठी सरकार कटीबद्ध आहे. चिकणमाती कालवण्यासाठी हस्तकला महामंडळ मूर्तीकारांना यंत्रही देत आहे.’’

संपादकीय भूमिका 

प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात, तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीविषयी प्रशासन यंदा तरी ठोस उपाययोजना काढील का ?