आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !
७ जण पोलिसांच्या कह्यात
पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – आगशी येथे बैलाची अवैधपणे वाहतूक करणे आणि तक्रारदाराला शिवीगाळ अन् मारहाण करणे या प्रकरणी आगशी पोलिसांनी हनुमंत कुतकनकेरी, मलिबूबसाब वालीकर, एडी डायस, माल्कम पाल्हा, मारियान रॉड्रिग्स, गुरुदास गावस आणि अन्य एक मिळून एकूण ७ जणांच्या विरोधात पशू क्रूरता निवारण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. या सातही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे बायताखोल, बोरी येथे नुकतीच सुमारे दीड टन गोमांसाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई झाल्याची घटना ताजी असतांना आगशी येथे गोवंशियाची अवैध वाहतूक होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सौजन्य इन गोवा 24 x7
बजरंग दलाचे गोवा राज्य संयोजक मनीष नाईक याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘बजरंग दलाचा एक कार्यकर्ता पणजीहून मडगावला जात असतांना त्याला आगशी येथे जुन्या टोलनाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी अडवलेल्या एका रिक्शामध्ये एक बैल दृष्टीस पडला. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने याविषयीची माहिती पोलिसांना दिली, तसेच रिक्शाचालकाकडे ‘बैलाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का ?’ याची विचारणा केली. कागदपत्रांची विचारणा केल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला तेथील ७ गुंडांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दोषींवर आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’’ हा बैल झुवारीनगर येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने सांगितले.
अवैध गोमांसाच्या वाहतुकीविषयी तक्रार करणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला धमकी
फोंडा – बायताखोल, बोरी येथे एका रिक्शामधून गोमांसाची बनावट कागदपत्रांसह वाहतूक केली जात असल्याची तक्रार बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड घालून रिक्शामधील सुमारे दीड टन गोमांस आणि ३ संशयितांना कह्यात घेतले होते. या गोमांसाची सरकारी नियमानुसार न्यायदंडाधिकार्यांच्या वतीने विल्हेवाट लावण्यात आली होती. या प्रकरणी तक्रार करणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला अज्ञाताने धमकी दिली आहे. या धमकीच्या प्रकरणी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|