मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची गाथा देशभरात पोचवली जाणार !
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यविभागाचा अभिनव उपक्रम !
मुंबई – मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची गाथा देशभरातील नागरिकांपर्यंत पोचवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘हा इतिहास मांडणार्यांनी पुढे यावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २९ ऑगस्ट या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. या वेळी ते म्हणाले की, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मंत्रीमंडळाची बैठक घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे. मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची माहिती युवा पिढीसह देशभरातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. यानिमित्त मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत पोचवा.
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत दिले. त्यानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार.-मुनगंटीवार pic.twitter.com/8Uxufk25tK
— AIR News Pune (@airnews_pune) August 29, 2023
असे होणार कार्यक्रम !
मराठवाडा मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येईल. ‘छत्रपती संभाजीनगर’ ही मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे या शहरातील शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात यावी. चौकांचे सुशोभीकरण करावे, भिंतींवर चित्रे काढावीत, तसेच रंगरंगोटी करावी. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील हुतात्मा स्मारकांवर रोषणाई करण्यात यावी. मराठवाडा मुक्तीसंग्रामविषयीचा माहितीपटही सिद्ध करण्यात यावा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता येण्यासाठी २६ जानेवारी २०२४ पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या.
मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारणार !
‘मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. या स्मारकामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी प्रदर्शनी, आर्ट गॅलरी, प्रेक्षागृह, नाट्यमंच, ग्रंथालय, उपहारगृह आदी सुविधा योग्य प्रमाणात असाव्यात. त्याकरता देशभरातील उत्तमोत्तम संग्रहालये आणि स्मारके यांची संबंधित समितीने पहाणी करावी’, अशी सूचनाही या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.