दोषींवर कारवाई करू ! – अतुल सावे, गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याणमंत्री
उमदी गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण
सांगली – उमदी येथील समता आश्रमशाळेत घडलेला प्रकार गंभीर आहे. सर्व विद्यार्थ्यांची मी भेटून माहिती घेतली असून १६९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या संदर्भात राज्यशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात असून त्यांना साहाय्यामध्ये कोणतीही कमतरता केली जाणार नाही. या संदर्भात उत्तरदायी असणार्या दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. अतुल सावे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत व सर्वोत्तम उपचाराबाबत जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी pic.twitter.com/gopfDtDRgQ
— DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI (@Info_Sangli) August 28, 2023
या प्रसंगी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, समाजकल्याण कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. देशमुख यांसह अन्य उपस्थित होते. कोल्हापूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी जत, माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयास आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अन् रुग्णालय, मिरज येथे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आणि धोक्याबाहेर आहे. एक दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी सांगितले.