साधकांना स्वभावदोष आणि अहं दूर करण्याची प्रेरणा देऊन त्यांच्याकडून योग्य कृती करून घेणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !
१. ‘महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ताट कसे असायला हवे ?’, याची सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी जाणीव करून देणे
‘वर्ष २०१५ मध्ये गुरुदेवांच्या कृपेने मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली होती. एकदा सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या समवेत बसून मला महाप्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळाली. मी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर सद़्गुरु दादा माझ्या ताटाकडे पहात म्हणाले, ‘‘अरे, असे कसे भोजन करतेस ? महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्या ताटात काहीही शेष रहायला नको.’’ त्या वेळी मी आवश्यकतेपेक्षा अधिक लोणचे घेतले होते. ते ताटात शेष राहिले होते. ‘आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यायला हवे’, असे सद़्गुरु दादांनी माझ्या लक्षात आणून दिले.
२. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या कृपेमुळे मनावर झालेला योग्य संस्कार
सद़्गुरु राजेंद्रदादांच्या कृपेने माझ्या मनावरचा अयोग्य संस्कार नष्ट झाला. ‘जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ताटात वाढून घ्यायचे आणि महाप्रसाद व्यवस्थित ग्रहण करायचा’, हे सद़्गुरु दादांच्या कृपेमुळे मी करू शकले.
३. महाप्रसाद घेतल्यानंतर ‘सनातनच्या तीन गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) महाप्रसाद ग्रहण केला आहे’, असे जाणवून आनंद होणे
मे २०२३ मध्ये महाप्रसाद घेतल्यानंतर माझ्या मनाला आनंद होत होता. प्रत्यक्षात ‘मी महाप्रसाद ग्रहण केला आहे’, असे मला वाटत नव्हते. ‘सनातनच्या तीन गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) मला माध्यम बनवून महाप्रसाद ग्रहण केला आहे’, असे वाटत होते. मी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ताटाकडे पाहिल्यावर गुरुदेव एका छायाचित्रात भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करून बसले आहेत, त्या ताटाचे मला स्मरण झाले.
४. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे माझ्या ताटाकडे पाहून म्हणाले, ‘‘महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आपले ताट असेच असायला हवे. ताटात कुणी जेवले आहे, असे वाटता कामा नये, इतके ते स्वच्छ असायला हवे.’’
५. कृतज्ञता
अ. गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून सद़्गुरु राजेंद्रदादांच्या पावन श्रीचरणी आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली. विशेष काही प्रयत्न न करताच सद़्गुरु दादांच्या कृपेने माझ्याकडून महाप्रसाद ग्रहण करतांना ताट स्वच्छ ठेवण्याची कृती होत होती.
आ. सद़्गुरु पिंगळेकाका यांच्या परम दिव्य श्री चरणांच्या कृपेने माझ्या मनात तो भाव आला आणि त्यांनीच त्या भावाप्रती माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त करून घेतली.
इ. ‘त्रिकालदर्शी सद़्गुरु माऊली साधकांना स्वभावदोष आणि अहं दूर करण्याची प्रेरणा देऊन तेच आमच्याकडून योग्य कृती करून घेत आहेत’, त्याबद्दल त्यांच्या परम दिव्य श्री चरणी आम्ही साधक कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२७.५.२०२३)